‘नवी मुंबई मेट्रोे'ची १७ एप्रिल पासून ‘रेल्वे'कडून अंतिम चाचणी

 ‘नवी मुंबई मेट्रोे'ला मे महिन्याचा मुहुर्त ?

खारघर ः बहुप्रतिक्षीत ‘नवी मुंबई मेट्रो'चे काम एप्रिल अखेर पर्यंत पूर्ण करण्यात यावे, असे आदेश ‘सिडको'ने ‘महामेट्रो'ला दिले आहे. त्याअनुषंगाने येत्या १७ एप्रिल पासून रेल्वे विभागाकडून पेंधर ते तळोजा मेट्रो मार्गावर ‘मेट्रो'ची अंतिम चाचणी  घ्ोण्यात येणार आहे. अंतिम चाचणी होताच ‘सिडको'कडून नवी मुंबई मेट्रो सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची ‘मेट्रो'ची प्रतिक्षा आता लवकरच संपुष्टात येणार आहे.

‘सिडको'ने  बेलापूर ते पेंधर या ११ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम २०११ रोजी सुरु केले आहे. त्यावेळी ‘नवी मुंबई मेट्रो'च सेवा पहिल्या चार वर्षांत सुरु होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ‘मेट्रोे'च्या या कामात अनेक विघ्न असल्यामुळे काम रखडले गेले. यानंतर नवी मुंबई मेट्रो सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने मागील वर्षी ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाची देखभाल-प्रकल्प सुरु करण्यासाठी सदरचे काम नागपूर मेट्रो प्रकल्प उभा करणाऱ्या ‘महामेट्रो'ला दिले.

मागील वर्षी पेंधर ते खारघर सेंट्रल पार्क या किमान ५ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम झाल्यांनतर ‘रेल्वे'च्या रिसर्च डिझाइन ॲण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ) कडून वेग आणि इतर प्रमाणपत्र ‘नवी मुंबई मेट्रोे'ला मिळाले होते.तसेच तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मार्गावर ‘मेट्रो'तून प्रवास देखील केला होता. मात्र, यानंतर उद्‌घाटनासाठी मुहूर्त सापडला नाही. दुसरीकडे खारघर ते बेलापूर सेंट्रल पार्क, उत्सव चौक, बेलपाडा, आरबीआय कॉलनी आणि बेलापूर या मेट्रो स्थानकाचे काम वेगाने करावे, अशी सूचना ‘महामेट्रो'ला देण्यात आली होती. त्यानुसार ‘महामेट्रो'कडून देखील वेगात काम सुरु आहे. ‘सिडको'ने या एप्रिल अखेर पर्यंत बेलापूर ते पेंधर मार्गाचे काम पूर्ण करावे, असे आदेश ‘महामेट्रो'ला दिले  आहे. त्यानुसार येत्या १७ एप्रिल पासून रेल्वे विभागाकडून पेंधर ते तळोजा मेट्रो मार्गावर अंतिम चाचणी घ्ोण्यात येणार आहे. चाचणी पूर्ण होताच रेल्वे कडून प्रमाणपत्र प्राप्त होईल आणि यानंतर सिडको नवी मुंबई मेट्रो सुरु करणार आहे. त्यामुळे नवी मुंबई मेट्रो मे महिन्यात रुळावर दिसण्याचे संकेत मिळत आहेत.

बेलापूर ते पेंधर मार्गावरील रेल्वे ट्रॅक, वीज वाहिन्या, सीसीटिव्ही नियंत्रण कक्ष, रेल्वे स्थानकावरील सरकते जीने आदि कामे पूर्ण झाली आहे. तसेच प्रत्येक स्थानकावर वाहने उभी करण्यासाठी वाहनतळाचे काम पूर्ण झाले आहे. प्रत्येक मेट्रो मार्गावर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना योग्य मार्गदर्शन केले जात आहे.

‘महामेट्रो'कडून बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गावरील खारघर ते बेलापूर मेट्रो स्थानकाचे काम दिवसा वेगात सुरु असते. तर रात्रीच्या वेळी या मार्गेवर ‘नवी मुंबई मेट्रो'चा सराव सुरु असतो, असे या मेट्रो मार्गावर काम करणाऱ्या कामगाराकडून समजले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘आप तर्फे ऐरोली, दिघा, तुर्भे, कोपरखैरणे, वाशी आणि नेरुळ विभागातील पोलीस ठाण्यांना सदिच्छा भेट