कोव्हीड रुग्णसंख्येतील वाढीच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केली रुग्णालयीन सुविधांची पाहणी

महापालिका आयुक्तांकडून ऐरोली रुग्णालयीन सुविधांची पाहणी

नवी मुंबई ः कोव्हीड रुग्णसंख्येतील वाढीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी टेस्टींग मध्ये वाढ करण्याचे त्याचप्रमाणे कोव्हीड आरोग्य सुविधाही सुसज्ज राखण्याचे निर्देश विशेष आढावा बैठकीत दिले होते. या अनुषंगाने आयुक्त नार्वेकर यांनी ऐरोली येथील महापालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयाला भेट देत तेथील आरोग्य सुविधेची बारकाईने पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. वर्षा राठोड, शहर अभियंता संजय देसाई आणि इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आयुक्तांनी मागील काही दिवसातील कोव्हीड टेस्टींग संख्येचा तपशील रजिस्टरमधून तपासला तसेच रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या आयएलआर आणि सारी रुग्णांची कोव्हीड टेस्टींग होत असल्याबाबत खातरजमा करुन घेतली. कोव्हीड टेस्टींगवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्त नार्वेकर यांनी यावेळी वैद्यकीय अधीक्षकांना दिल्या.

दुसरीकडे आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार वाशी, नेरुळ आणि ऐरोली रुग्णालयात फ्लू  ओपीडी सुरु करण्यात आलेली आहे. आयुक्तांनी ऐरोली रुग्णालयातील फ्लू  ओपीडीचीही पाहणी करुन तेथील तपासणी आणि उपचार पध्दतीची पाहणी केली. ऐरोली रुग्णालयात पुरुष आणि महिला कोव्हीड रुग्णांकरिता प्रत्येकी २० बेडस्‌ची क्षमता असलेले कक्ष राखीव ठेवण्यात आलेले आहेत. याकरिता आवश्यक मेडीसीन आणि ऑक्सिजन सुविधेचीही व्यवस्था करण्यात आली असून त्याची प्रत्यक्ष पाहणी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतला.

सदर पाहणी दौऱ्यात आयुक्त नार्वेकर यांनी सर्व ओपीडी टेस्टींग, डायलेसीस सेंटर, प्रसुती आणि इतर सर्व वॉर्डस्‌, अभिलेख कक्ष, उपहारगृह, निर्जंतुकीकरण विभाग अशा विविध सुविधा कक्षांना भेटी देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. रजिस्टर तपासणी करुन रुग्णसेवेची संख्या जाणून घेतली. त्याचप्रमाणे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांच्या महापालिका आरोग्य सेवेविषयीचे अभिप्राय, सूचना जाणून घेतल्या.

सध्या सगळीकडेच कोव्हीड रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून नागरिकांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळल्यास त्वरित महापालिकेच्या रुग्णालयात आणि प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रास भेट देऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा, उपचार करुन घ्यावेत. प्रसंगी कोव्हीड टेस्ट करुन घ्यावी. - राजेश नार्वेकर, आयुक्त - नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जलवाहिनी दुरुस्तीनंतर तब्बल ४२ तासांनी तुर्भेसह नवी मुंबई शहरातील अन्य भागात गढूळ पाणी पुरवठा