‘सिडको'च्या कार्मिक विभागाचे गत १० वर्षाचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश

 ‘सिडको'तील बोगस कर्मचारी वेतन घोटाळ्यात २८ नावे उघड

नवी मुंबई ः ‘सिडको'मधील बोगस कर्मचारी वेतन घोटाळा प्रकरणात ११ एप्रिल पर्यंत १४ बोगस कर्मचाऱ्यांची नावे उघडकीस आली होती. यानंतर १३ एप्रिल रोजी चौकशीअंती बोगस कर्मचाऱ्यांची संख्या २८ वर पोहचली आहे. तसेच बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे वेतन घोटाळा करणारा ‘सिडको'च्या कार्मिक विभागातील सहाय्यक अधिकारी सागर तपाडिया मुख्य संशयित आरोपी असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ‘सिडको'च्या वतीने १२ एप्रिल रोजी रात्री त्याच्या विरोधात सीबीडी पोलिस ठाण्यात फसवणुकीसह बनावटगिरी आणि अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याला अद्याप अटक केलेली नाही. ‘सिडको'तील बोगस कर्मचारी वेतन घोटाळा सन २०१७ पासून सुरु झाला.

त्यावेळेस चेतन बावत (२ लाख ८० हजार), किशोर पिडीआर (२ लाख ७४ हजार), प्रिया रामटेके (२ लाख ७४ हजार), संगिता बैध (२ लाख ७४ हजार), शालिनी रामटेके (२ लाख ७० हजार), उर्मिला घायर (५ लाख ४४ हजार) या ६ बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे वेतन काढण्यात आल्याची बाब ‘सिडको'च्या दक्षता विभागाने केलेल्या चौकशी समोर आली आहे. त्यानंतर आरोपी तपाडिया याची पनवेल येथील सिडको कार्यालयात बदली झाल्याने सन २०१८, २०१९ आणि २०२० मध्ये बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे वेतन निघाले नाही. पण, सन २०२१ मध्ये पुन्हा आरोपी तपाडिया याची नियुक्ती कार्मिक विभागात झाल्यानंतर सन २०२१ पासून पुन्हा बोगस कर्मर्चाऱ्यांच्या नावे ‘सिडको'च्या तिजोरीतून वेतन काढण्यात आल्याचे तपासात आढळून आले आहे. सन २०२१ मध्ये १० बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे सुमारे २१ लाख, सन २०२२ मध्ये २४ बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे १ कोटी ६९ लाख तर सन २०२३ मध्ये १९ बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे ७२ लाख ६२ हजार रुपये वेतनापोटी हडप करण्यात आल्याची माहिती दक्षता विभागाने केलेल्या तपासात निदर्शनास आली आहे. अशा पध्दतीने सहाय्यक कार्मिक अधिकारी सागर तपाडिया याने २०१७ ते एप्रिल २०२३ या कालावधीत तब्बल २ कोटी ८१ लाख ९३ हजार रुपयांचा अपहार केल्याचे तपासात आढळून आले. यानंतर ‘सिडको'च्या कार्मिक विभागाचे व्यवस्थापक फैयाज खान यांनी १२ एप्रिल रोजी रात्री उशीरा सागर तपाडिया याच्या विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणात रात्री उशीरा गुन्हा दाखल झाल्याने अद्याप आरोपी सागर तपाडीया याला अटक करण्यात आली नसल्याची माहिती सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी दिली.

या बोगस कर्मचारी वेतन घोटाळ्यातील आरोपी सागर तपाडिया यापूर्वी पनवेल येथील सिडको नोडल कार्यालयात कार्यरत असताना लाच घेतल्याप्रकरणी पकडला गेल्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर सन २०२१ मध्ये पुन्हा सेवेत रुजू झाल्यावर तपाडिया याची नियुक्ती ‘सिडको'च्या कार्मिक विभागात सहाय्यकअधिकारी म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर आता बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे करोडो रुपयांचा वेतन घोटाळाकरण्यामध्ये सुध्दा प्रमुख आरोपी म्हणून सागर तपाडिया याचे नाव दक्षता विभागाने केलेल्या चौकशीत समोर आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऐरोलीतील स्मारक सर्वोत्तम ज्ञानस्मारक असल्याचे अभिप्राय