ऐरोलीतील स्मारक सर्वोत्तम ज्ञानस्मारक असल्याचे अभिप्राय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा नावलौकीक सर्वदूर

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेने ऐरोली, सेक्टर-१५ येथे उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक देश-परदेशातील विविध स्मारकांपेक्षा अत्यंत आगळे-वेगळे सर्वोत्तम ज्ञानस्मारक असल्याचे अभिप्राय विविध क्षेत्रातील मान्यवरांप्रमाणेच लाखोंच्या संख्येने स्मारकाला भेट देणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केले आहेत. सर्वसाधारपणे महापुरुषांचे स्मारक म्हणजे त्या महापुरुषाचा पुतळा आणि संबंधीत गोष्टी इतकीच संकल्पना दिसते. परंतु, डॉ. आंबेडकर स्मारक या पारंपारिक संकल्पनांना छेद देणारे असून सदर पुतळा विरहीत स्मारक येथील समृध्द ग्रंथालय आणि इतर अनेक सुविधा कक्षांमधून बाबासाहेबांच्या विचारांचे ठायीठायी दर्शन घडविते अशा प्रतिक्रिया महाराष्ट्रातील अनेक नामवंत विचारवंतांनी व्याख्यानांप्रसंगी जाहीरपणे व्यक्त केल्या आहेत. ५ डिसेंबर २०२१ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यमान मुख्यमंत्री तथा तत्कालीन पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते स्मारकातील विविध अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण झाले होते. तेव्हापासून मागील १ वर्ष ४  महिन्यांमध्ये म्हणजेच १२ एप्रिल २०२३ पर्यंत ४९४ दिवसांमध्ये स्मारकाला देश-परदेशातून १ लाख १२ हजार ८२६ इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांनी भेट दिली आहे. यावेळी प्रत्येकाने या स्मारकाच्या वेगळेपणाचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.

स्मारकामध्ये बाबासाहेबांचे जीवनचरित्र दर्शन घडविणारे दुर्मिळ छायाचित्रांचे दालन, ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण ई-लायब्ररीसह समृध्द ग्रंथालय, अत्याधुनिक होलोग्राफीक आभासी चलचित्रप्रणाली द्वारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची सुविधा, एकाच वेळी २०० व्यक्ती ध्यान करु शकतील असे भव्यतम ध्यानकेंद्र, संविधान विषयीच्या पुस्तकाचे विशेष दालन तसेच २५० आसन क्षमतेचे वातानुकुलीत प्रशस्त सभागृह अशा उत्तम दर्जाच्या सुविधांनी डॉ. आंबेडकर स्मारक वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. रस्त्यावरुन लांबूनच नजरेत भरणारा ५० मीटर उंचीचा भव्य डोम लक्ष वेधून घ्ोतो. बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्नतेचे प्रतिक म्हणून या डोमला पेनच्या नीबचा आकार देण्यात आलेला आहे. ‘ज्ञान हीच शक्ती' या बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित ग्रंथावर पेन हाती धरलेली भव्यतम आकर्षक शिल्पाकृती या स्मारकाचा आत्मा आहे. याठिकाणी ज्ञानजागर व्हावा यादृष्टीने अगदी सुरुवातीपासूनच येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने ‘विचारवेध' या शिर्षकांतर्गत आयोजित करण्यात आलेली आहेत. याशिवाय बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘जागर' व्याख्यानमाला आयोजित करुन बाबासाहेबांच्या प्रेरणादायी स्मृतींना वैचारिक आदरांजली अर्पण करण्याची परंपरा अव्याहत सुरु आहे.

यामध्ये उत्तम कांबळे, डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. सुखदेव थोरात, डॉ. रावसाहेब कसबे, गिरीश कुबेर, राजीव खांडेकर, हरी नरके, नागराज मंजुळे, अरविंद जगताप, बाबा भांड, डॉ. गणेश चंदनशिवे, योगीराज बागुल, डॉ. शरद गायकवाड, विजय चोरमारे, राही भिडे, नामदेव काटकर, सुरेश सावंत, आदि विविध क्षेत्रातील मान्यवर व्याख्याते सहभागी झाले आहेत. येथील व्याख्यान परंपरेतून नवी मुंबईची सांस्कृतिक शहर अशी ओळख निर्माण होण्यासाठी भक्कम पाया रचला गेलेला आहे. आजकाल वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. पुस्तके वाचली जात नाहीत, व्याख्याने ऐकली जात नाहीत असे निराशावादी सूर एका बाजुला उमटत असताना स्मारकातील प्रत्येक व्याख्यानाला सभागृह हाऊसफुल्ल भरुन सभागृहाबाहेर एलईडी स्क्रिन लावून थेट प्रक्षेपण करणे गरजेचे व्हावे एवढी श्रोत्यांची गर्दी होत असल्याचे काहीसे दुर्मिळ चित्र येथे पहावयास मिळत आहे. स्मारकाच्या ीींस्ंा्‌व्ीीएस्ीीव् या फेसबुक, टि्‌वटर, इंस्टाग्राम आणि शेअर चॅट या स्वतंत्र सोशल मिडीया पेज आणि त्यावरील एकाद्या पोस्टलाही नागरिकांचे हजारो अभिप्राय लाईक्स आणि कमेंटस्‌ द्वारे प्राप्त होत आहेत.

५ डिसेंबर २०२१ रोजी लोकांसाठी खुले करण्यात आलेल्या या स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिन, संविधान दिन, बौध्द पौर्णिमा अशा चारही दिवशी नागरिकांची ५००० हून अधिक उपस्थिती लाभलेली आहे. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी साधारणतः २५० हून अधिक नागरिक याठिकाणी भेटी देताना दिसतात. अनेक नागरिक आपल्या कुटुंबासह स्मारकामध्ये येऊन बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांना सहकुटुंब अभिवादन करतात. अनेक ठिकाणच्या संस्था, मंडळे, समुह एकत्र येऊन स्मारकाची शैक्षणिक सहल आयोजित करताना दिसतात. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोव्हीड रुग्णसंख्येतील वाढीच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केली रुग्णालयीन सुविधांची पाहणी