नवी मुंबईत रस्त्याचा ताबा घेण्यासाठी वाहन चालकांची नामी शक्कल

 नवी मुंबई मध्ये रस्त्यावरच वृक्षारोपण

वाशी ः नवी मुंबई शहरात रस्त्याचा ताबा घेण्यासाठी वाहन चालकांनी नामी शक्कल लढवली आहे. त्यासाठी वृक्षारोपणाचा आधार घ्ोतला जात असून, खाजगी वाहनांना सुरक्षा मिळावी म्हणून रस्त्यातच कुंड्यामध्ये वृक्षारोपण केले जात आहे. मात्र, या प्रकाराने मुळ रस्ता अरुंद होत असून, इतर वाहतुकीला बाधा निर्माण होत आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने वेळीच रस्त्यावरील वृक्षारोपण  केलेल्या कुंड्या जप्त करुन, रस्ते पूर्ण क्षमतेने वाहतुकीला खुले करावेत, अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

नवी मुंबई शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत वाहन संख्या देखील तितकीच वाढत आहे. नवी मुंबई शहरात आज ६ लाख पेक्षा जास्त नोंदीत वाहने असून, रोज हजारो वाहने नवी मुंबई शहरातून ये-जा करत असतात. त्यामुळे नवी मुंबई शहरात वाहन पार्किंग समस्या बिकट होत चालली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी दैनंदिन वाहन पार्किंग मरण्यासाठी वाहन चालकांनी वृक्षारोपणाचा आधार घेतला आहे. काही वाहन चालक रस्त्यावरच झाडांच्या कुंड्या उभ्या करुन जागा आरक्षित करत आहेत. सद्यस्थितीत वाशी, तुर्भे, कोपरखैरणे आदी भागात रस्त्यावरच झाडांच्या कुंड्या उभ्या करुन जागा आरक्षित करण्याचे प्रकार सुरु असून, यात रिक्षा चालक देखील आघाडीवर आहेत. मात्र, रस्त्यावरच झाडांच्या कुंड्या उभ्या करण्याच्या प्रकाराने रस्त्याची रुंदी कमी होऊन रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. मात्र, या साऱ्या प्रकाराकडे ना वाहतूक विभागाचे लक्ष ना महापालिका प्रशासनाचे लक्ष. त्यामुळे वाहन चालक नाराजी व्यक्त करत आहेत. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने वेळीच रस्त्यावरील कुंड्या जप्त करुन रस्ते  पूर्ण क्षमतेने वाहतुकीला खुले करण्याची मागणी वाहन चालक करीत आहेत.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तीन दिवस नवी मुंबई मध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य