सिडको महामंडळाची सुमारे ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

बोगस कर्मचा-यांनी वेतनापोटी सिडकोचे 3 कोटी लाटले

नवी मुंबई : सिडकोच्या आस्थापनेवर कुठल्याही पदावर नियुक्ती झालेली नसताना १४ कर्मचाऱयांची समन्वयक व सल्लागार या पदावर नियुक्ती झाल्याचे दाखवून या 14 बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे सन २०१७ पासून ते आजतागायत प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपये वेतन काढून सिडको महामंडळाची सुमारे ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सिडकोतीलच काही अधिका-यांनी संगनमत करुन केल्याची बाब समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी चेतन बावत नामक व्यक्तीने सिडको कार्यालयातील लेखा विभागात जाऊन मी सिडकोत कामाला नसतानाही माझ्या नावे मोठ्या प्रमाणात बँकेत वेतन जमा होत असल्याची तक्रार केली होती. तसेच आयकर विभागाने आपल्याला आयकर भरत नसल्याबाबतची नोटीस बजावल्याची माहिती दिली. तसेच त्याच्या नावे कुठल्या बँकेत पगार जमा होत आहे,? याचा जाब त्याने सिडकोच्या लेखा विभागातील अधिका-यांना विचारला.

त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. त्यानंतर लेखा व कार्मिक विभागाने कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर या नावाची कोणतीच व्यक्ती सिडकोच्या आस्थापनेवर नसल्याची बाब समोर आली. सदर बाब सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या संपुर्ण प्रकरणाची दक्षता विभागाचे प्रमुख पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे यांना सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दक्षता विभागाने केलेल्या चौकशीत आतापर्यंत १४ बोगस कर्मचा-यांची नावे उघड झाली आहेत. यापैकी चेतन बावत व अमित खेरालिया या दोन व्यक्तींनी सिडको व्यवस्थापनाकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. 

दरम्यान,१४ बोगस कर्मचारी सिडकोच्या आस्थापनेवर कार्यरत नसतानाही त्यांच्या नावे सन २०१७ पासून सिडको महामंडळातून वेतन निघत असल्याची बाब समोर आली आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या बोगस कर्मचा-यांच्या वेतनावर सिडकोचे सुमारे ३ कोटी रुपये लाटले गेल्याचे निदर्शनास आले आहे. अजून असे किती बोगस कर्मचारी उघडकीस येतात ते चौकशीअंती व फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. तसेच या घोटाळ्यात सिडकोच्या अधिका-यांसोबत बोगस बँक खाते उघडणा-या कर्मचा-यांचे देखील संगनमत आहे का याचा देखील तपास केला जात असल्याची माहिती सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विवेकानंद संकुलात सुलेखनकार विलास समेळ यांची सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा