महापालिका हद्दीत अडीच लाख वृक्ष लागवड

 नवी मुंबईत मियावाकी जंगल उभारणीवर भर

वाशी ः पर्यावरणशील शहर निर्मिती करिता नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वृक्षारोपण-संवर्धनाकडे विशेष लक्ष दिले आहे. त्या अनुषंगाने मागील दोन-तीन वर्षापासून मियावाकी पध्दतीने झाडे लावण्यावर भर दिला गेला आहे. त्यामुळे शहरात मानव निर्मित मियावाकी जंगले आकार घेताना दिसत असून महापालिका हद्दीत आतापर्यंत अडीच लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

जगात झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने आज पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे पृथ्वीवरील तापमानात वाढ होत चालली असून संपूर्ण जगाला ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करावा लागत आहे. याला भारत देखील अपवाद नाही. आपल्या कडे देखील विकास कामाच्या नावाखाली बेसुमार वृक्ष कत्तल होताना दिसत आहे. त्यामुळे पर्यावरणशील शहर निर्मितीकरिता नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वृक्षारोपण-संवर्धनाकडे विशेष भर दिला असून जास्तीत जास्त झाडे लावली जात आहेत. मात्र, शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे जपानी पध्दतीवर मियावाकी संकल्पनेवर महापालिका उद्यान विभागाने जोर दिला असून कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावली जात आहेत. शिवाय झाडांची निवड करताना देशी झाडांवर अधिक भर दिल्याने पक्षांना सहज अन्न उपलब्ध होत आहे. त्यामुळे पक्षांचा अधिवास देखील वाढत आहे.

महापालिका हद्दीत आतापर्यंत मियावाकी पध्दतीने अडीच लाख झाडे लावली असून सर्व झाडे सीएसआर फंडातून लावली गेली आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरात आता मानव निर्मित मियावाकी जंगले आकार घेताना दिसत आहेत. यात नेरुळ मधील ज्वेल ऑफ नवी मुंबई १ लाख ३६ हजार, कोपरखैरणे निसर्ग उद्यान १ लाख १ हजार, बेलापूर विभागात १३ हजार अशी झाडे लावली आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक विजय कांबळे आणि प्रकाश गिरी यांनी दिली.

ज्वेल ऑफ नवी मुंबई देशातील सर्वात मोठे मियावाकी जंगल...
शहरातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी पर्यावरणाच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेने मियावाकी वृक्ष लागवडीवर भर दिला आहे. त्यानुसार शहरात ठिकठिकाणी वृक्ष लागवड केली जात आहे. नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी आतापर्यंत १,३६,००० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे ज्वेल ऑफ नवी मुंबईचे ठिकाण देशातील सर्वात मोठे मियावाकी जंगल ठरत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राज्यभरातील शिधापत्रिका धारकांना फक्त १०० रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा'चे वाटप