नवीन आर्थिक वर्षात पहिल्या १० दिवसात १०.५० कोटींची मालमत्ता कर वसुली

मालमत्ता कर वसुलीची गतिमानता महापालिकेकडून कायम

नवी मुंबई ः सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर विभागाने मागील वर्षीपेक्षा १०७.१७ कोटी रुपयांचे अधिक उत्पन्न मिळवित मालमत्ता कर विभागाने एका वर्षात मिळविलेल्या उत्पन्नाचा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यापाठोपाठ आता मालमत्ता कर विभागाचे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील पहिल्याच एप्रिल महिन्याच्या पहिल्या १० दिवसामध्येच मार्च महिन्यातील कर वसुलीची गतिमानता कायम राखत १० कोटी ५० लाख रुपये इतके उत्पन्न मालमत्ताकरापोटी जमा केले आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त तथा मालमत्ता कर विभागाच्या प्रमुख सुजाता ढोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत नियोजनबध्द काम करुन उत्पन्नाचे उद्दिष्ट ५७५ कोटी पेक्षा अधिक ६३३.१७ कोटी रुपये इतकी मालमत्ता कर वसूली करण्यापर्यंत झेप घेेतली. ३१ मार्च २०२३ या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या एका दिवसात १८.९२ कोटी इतके उत्पन्न जमा करण्यात आले. तो देखील कररुपी महसूल संकलनाचा विक्रम होता.

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता ८०१ कोटी रुपये इतके उत्पन्न मालमत्ता करातून जमा होईल, असे उद्दिष्ट महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अंदाजपत्रक सादर करताना मालमत्ता कर विभागापुढे ठेवलेले आहे. त्यादृष्टीने मालमत्ता कर विभाग नियोजनबध्द पावले टाकत आहे. याचीच परिणीती म्हणजे एप्रिल महिन्याच्या पहिल्या १० दिवसात १० कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न मालमत्ता करापोटी जमा झालेले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका हद्दीत अडीच लाख वृक्ष लागवड