वाशी मधील धोकादायक २८ झाडे तोडण्याबाबत रहिवाशांचा संताप

वाशी, सेवटर-२ मध्ये  झाडे तोडण्याला रहिवाशांना विरोध

नवी मुंबई ः वाशी, सेक्टर-२ मधील धोकादायक २८ झाडे तोडण्याबाबत नवी मुंबई महापालिका उद्यान विभागामार्फत झाडांना नोटीसा लावण्यात आल्या आहेत. परंतु, सदर  झाडे न तोडण्याची स्थानिक रहिवाशांची मागणी लक्षात घेता ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका उद्यान विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर यांच्यासह वाशी येथे पाहणी दौरा केला. याप्रसंगी माजी महापौर चंदू राणे, माजी नगरसेवक राजू शिंदे, जितेंद्र कांबळी, ज्योती कांबळी, जयेश सामंत, जेम्स आवारे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. दरम्यान, ४० ते ४५ वर्षांपूर्वीची झाडे तोडल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

वाशी, सेवटर-२ मध्ये पाहणी दौरा केलेला आहे. महापालिकेने येथील २८ झाडांना धोकादायक असल्याचे सांगून ती तोडण्यासाठी नोटीसा लावल्या आहेत. याठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्याचे कारण समोर करुन महापालिकेने अस्तित्वात येण्याआधीची ४०-५० वर्षांपूर्वीची झाडे तोडणे चुकीचे आहे. रस्ता रुंदीकरण करणे काळाची गरज आहे; परंतु त्याकरिता झाडांचा बळी देण्याऐवजी समोरच असलेल्या शिधावाटप कार्यालय, बँका अशा शासकीय संस्थां मार्फत झालेले अतिक्रमण किंवा अनधिकृतपणे कंपाऊंड वॉल टाकून रस्त्यांवर केलेला वापर बंद केल्यास रस्ता रुंदीकरण होऊ शकतो, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

इतकी वर्षे सदर झाडे येथील स्थानिक महिला, ज्येष्ठ यांनी वाढवली आहेत, जपली आहेत. या झाडांबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. झाडे जगणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे प्रथम कर्तव्य मानून या विभागातील स्थानिक नागरिकांनी याबाबत माझ्याकडे विनंती केली आहे. त्याअनुषंगाने महापालिका उद्यान विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर यांच्यासोबत पाहणी दौरा केला. झाडे तोडण्यापेक्षा येथील अनधिकृत बांधकाम काढा, अनधिकृतपणे केल्या जाणाऱ्या पार्किंग वर कारवाई करा. नागरिकांच्या सर्व समस्या अधिकाऱ्यांच्या नजरेत आणून दिलेल्या आहेत. याकरिता आयुक्तांचीही भेट घेणार असून महापालिका रि-डेव्हलपमेंटच्या नावाखाली विकासकांसाठी झाडे तोडत असतील तर जनतेसाठी प्राण गेले तरी चालतील; परंतु एकाही झाडाला हात लावू देणार नाही, असा इशारा आ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी दिला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवीन आर्थिक वर्षात पहिल्या १० दिवसात १०.५० कोटींची मालमत्ता कर वसुली