२५ लाखांहुन श्री सदस्य राहणार उपस्थित; मुख्यमंत्र्यांकडून खारघरमध्ये पाहणी

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार'ने गौरव

नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते १६ एप्रिल२०२३ रोजी खारघर मधील कॉर्पोरेट पार्क येथे आयोजित सोहळ्यात वितरीत केला जाणार आहे.

दरम्यान, या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सुमारे २५ लाखांहुन अधिक श्री सदस्य उपस्थित राहण्याची शवयता आहे. यामुळे या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढणार आहे. म्हणूनच माझ्यासह सर्वांनी झोकून देऊन काम करुया, या पुरस्कार वितरण सोहळ्याची इतिहासात नोंद घ्ोतली जाईल. ‘न भूतो न भविष्यती' असा सदर कार्यक्रम करु, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खारघर येथे केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण-२०२२ पुरस्कार वितरण पूर्वतयारी आढावा बैठक खारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

सदर बैठकीप्रसंगी ‘रायगड'चे पालकमंत्री उदय सामंत, ‘ठाणे'चे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, पंकज डहाणे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पांडे आदि मान्यवर उपस्थित होते.

येत्या १६ एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन काळजीपूर्वक व्हावे. शासनाची आणि प्रशासनाची सर्वस्वी जबाबदारी आहे, त्यांना श्री सदस्य सहकार्य करण्यासाठी सज्ज आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.  

तसेच इतक्या तातडीने आपण बैठक घेत आहोत याबाबत सर्वांनी गांभीर्याने विचार करावा. त्याप्रमाणे काटेकोर नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी, शिस्तबध्द पध्दतीने पार पाडण्यासाठी सज्ज होऊया, असे सांगतानाच या दिमाखदार कार्यक्रमासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासित उद्‌गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटी काढले.

दरम्यान, सदर आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ज्या मैदानात होणार आहे, त्या मैदानाची आणि तेथील इतर व्यवस्थांची पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांशी मैदानातील व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र खेचुन पलायन