आरोग्य विभागाने गाफील न राहण्याचे आयुवत नार्वेकर यांचे निर्देश

कोव्हीड रुग्णवाढ; महापालिका सतर्क

नवी मुंबई ः कोव्हीड रुग्णवाढीला काही प्रमाणात सुरुवात झालेली निदर्शनास येत असून कोणत्याही प्रकारे गाफील न राहता कोव्हीड टेस्टींगमध्ये वाढ करण्यात यावी. तसेच कोव्हीड उपचार केंद्रांमधील सुविधाही कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने नियोजन करण्याचे निर्देश महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त राजेश नार्वेकर यांनी, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या उपस्थितीत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील तसेच महापालिका रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, मुख्यालय स्तरावरील वैद्यकीय अधिकारी आणि सर्व २३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करीत कोरोनास्थितीचा विभागनिहाय बारकाईने आढावा घेतला.

यामध्ये आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आढावा घेत त्यांच्या कार्यक्षेत्रात होत असलेल्या टेस्टींग आणि त्यामधील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण या आकडेवारीचे बारकाईने निरीक्षण केले. नागरी आरोग्य केंद्रांवर तसेच महापालिका रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या आयएलआर आणिसारी रुग्णांची कटाक्षाने कोव्हीड टेस्टिंग करण्याचे निर्देश आयुवत नार्वेकर यांनी यावेळी दिले. टेस्टींगच्या प्रमाणात वाढ करण्याच्या सूचना देतानाच शासन निर्देशानुसार ६० टक्के आरटीपीसीआर टेस्टस्‌ आणि ४० टक्के ॲन्टीजेन टेस्टस्‌ प्रमाण राखण्याची काळजी घ्यावी. रुग्णालयांमध्ये २४ तास टेस्टींगबाबतही कार्यवाही करण्यात यावी. महत्वाचे म्हणजे महापालिकेच्या दोन्ही टेस्टींग लॅब पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहतील, याकडेही लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.

टेस्टींगमध्ये आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांवरील उपचार आणि त्या रुग्णांचे ७ दिवस गृहविलगीकरण करणे तसेच सहव्याधी असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर विशेष लक्ष देण्यात यावे. ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिड रुग्ण यांच्याकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष द्यावे. नवी मुंबई महापालिका रुग्णालये आणि नागरी आरोग्य केंद्रे येथील ओपीडी प्रमाणेच महापालिका कार्यक्षेत्रातील खाजगी डॉक्टरांच्या ओपीडीवरही स्थानिक वैद्यकीय अधिकारी यांनी लक्ष द्यावे. त्यांच्याकडून रूग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आलेल्या रुग्णांच्या स्थितीवरही बारकाईने लक्ष द्यावे. आपल्याला कोव्हीड  वरील उपचारांचा मागील दोन, अडीच वर्षात पूर्वानुभव असला तरी कोणत्याही प्रकारे निष्काळजी न राहता कोव्हीडचा विषाणू आपले स्वरुप बदलतो ते लक्षात घेऊन अत्यंत सतर्क राहण्याचे आणि तत्पर कार्यवाहीचे निर्देश आयुवतांनी यावेळी दिले.

महापालिकेच्या वाशी, ऐरोली, नेरुळ येथील तिन्ही सार्वजनिक रुग्णालयांच्या ठिकाणी कोव्हीड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी एकूण ५० बेडस्‌ची सुविधा कोव्हीड रुग्णांवरील उपचारासाठी सद्यस्थितीत कार्यान्वित आहे. तरीही वाढत्या रुग्णसंख्येची व्याप्ती पाहता सर्व रुग्णालये तसेच सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथील अतिदक्षता विभाग सुविधेतील ७५ बेडस्‌ सर्व अत्यावश्यक सुविधांनी सुसज्ज असल्याची पडताळणी करुन घ्यावी. त्याचप्रमाणे कोव्हीड रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी पूर्वीप्रमाणे कोव्हीड वॉर रुम तत्परतेने कार्यान्वित करण्याचेही निर्देश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आढवा बैठकीत दिले.

गृह विलगीकरणात राहणा-या कोव्हीड पॉझिटिव्ह रूग्णांकरिता असलेल्या शासन नियमांनुसार योग्य त्या उपाययोजना विभाग कार्यालयांमार्फत करून घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले.  

कोव्हीडची रुग्णवाढ लक्षात घेता नागरिकांनी घाबरुन जाऊ नये; मात्र सतर्क रहावे. प्रत्येक नागरिकाने स्वतःचे तसेच आपल्या संपर्कात येणाऱ्या कुटुंबिय व मित्र, सहकारी, परिवाराचे आरोग्य जपणुकीच्या दृष्टीने सर्दी, ताप, खोकला अथवा कोव्हीड सदृश्य लक्षणे आढळल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा. कोव्हीड टेस्टींग करुन घ्यावी आणि कोव्हीड पासून दूर राहण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी येथील महाआरोग्य शिबिरात ७९१ जणांची आरोग्य तपासणी