शाळेचे मैदान खाजगी संस्थेला आंदण?

कोपरी येथे शाळेच्या मैदानावर खाजगी क्रिकेट अ‍ॅकॅडमी 

वाशी ः नवी मुंबई शहरातील बहुतांश शाळांना ‘सिडको'ने मैदाने उपलब्ध करुन दिली आहेत. महत्वाचे म्हणजे शाळेच्या वेळेव्यतिरिक्त सदर मैदाने स्थानिक मुलांना खेळासाठी उपलब्ध करुन देणे संबंधित शाळांना बंधनकारक आहे. असा नियम असून देखील काही शाळा परस्पर खेळाची मैदाने खाजगी संस्थांना व्यावसायिक वापरासाठी देत असून तुर्भे विभागातील कोपरी गावात देखील हाच प्रकार सुरु आहे.

वाशी, सेवटर-२६ कोपरी गांव येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, नवी मुंबई विद्यालयाच्या मागील बाजुला खेळाचे मैदान आहे. मात्र, या ठिकाणी खाजगी क्रिकेट अ‍ॅकॅडमी  मार्फत मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण व्यावसायिक पध्दतीने दिले जात आहे. या अ‍ॅकॅडमीने संपूर्ण मैदानाची जागा व्यापून घेतली आहे. त्यामुळे शाळेसह या परिसरातील स्थानिक मुले देखील मैदानाअभावी मैदानी खेळांसाठी मुकत आहेत. परिणामी, येथील शाळेची आणि स्थानिक मुलांची मैदानी खेळांची गैरसोय होत आहे.

‘सिडको' सोबत  केलेल्या करारानुसार शाळेची मैदाने परस्पर त्रयस्थ संस्था, व्यक्ती यांना भाड्याने किंवा वापरासाठी देता येत नाही. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त सदर मैदाने स्थानिक मुलांना खेळासाठी उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. २०१६ साली तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या नियमांची अंमलबजावणी करत मैदाने शाळेच्या वेळेव्यतिरिक्त सर्व सामान्य खेळाडुंसाठी खुली केली होती. मात्र, मुंढे यांची बदली होताच परिस्थिती जैसे थे वैसे झाली आहे. आता तर काही शाळांम्ये खाजगी संस्थांद्वारे फुटबॉल टर्फ बनवून त्याचा व्यावसायिक वापर सुरु ठेवण्यात आला आहे. पण, या साऱ्या प्रकाराकडे महापालिका आणि सिडको प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक खेळाडुंवर अन्याय होत आहे.

आमच्या शाळेच्या मैदानात क्रिकेट अ‍ॅकॅडमी सुरू करण्यास रितसर परवानगी मिळावी म्हणून आम्ही ‘सिडको'कडे अर्ज केला आहे. -संजय महाजन, संचालक-स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नाल्यात बदल किंवा बांधकाम करण्यास मज्जाव असताना नाल्यातच जाहिरात फलक उभारण्याची किमया