टि्‌वटर वर गाजला ##CidcoOverPricedHome हॅशटॅग

घरांच्या किंमती कमी करण्यासाठी मनसे सोडतधारकांच्या पाठिशी -गजानन काळे

नवी मुंबई ः ‘सिडको'ने दिवाळी-२०२२ मध्ये अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी ७८४९ घरांची महागृहनिर्माण योजना अंतर्गत सोडत काढली होती. सदर सोडत काढताना सोडतधारकांना उत्पन्न मर्यादा मासिक कमाल २५ हजार रुपये आणि वार्षिक ३ लाख रुपये ठेवली होती. परंतु, ‘सिडको'ने या घरांची किंमत ३५ लाख रुपये ठेवली आहे. परिणामी, सोडतधारकांना कर्ज मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. तसेच सदर घरे अत्यंत महाग आहेत. त्यामुळे ‘सिडको'ने या घरांच्या किंमती कमी कराव्यात, अशी मागणी सोडत धारकांची आणि ‘मनसे'कडून करण्यात आली आहे.

त्याचबरोबर ‘सिडको'ने सोडतीची जाहिरात काढताना घरे ३२२ चौरस फुट क्षेत्रफळाची असतील, असे सांगितले होते. पण, प्रत्यक्षात सदर घरे २९० चौरस फुटाची असल्याचे सोडतधारकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ‘सिडको'ने येथील घरांचे दर खाजगी विकासाकासारखे अवाजवी ठेवून घराचे क्षेत्र कमी दिले आहे. त्यामुळे घरांच्या किंमती प्रामुख्याने कमी करण्यात याव्यात अशी मागणी प्रखरपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्यासमोर मांडण्यासाठी ‘सिडको'च्या सोडतधारकांनी ८ एप्रिल रोजी  #CidcoWaiveOffOtherCharges असा हॅशटॅग वापरुन टि्‌वटर वर जोरदार मोहीम चालवली. जवळपास ४००० पेक्षा जास्त टि्‌वट करण्यात आले. यावरुन मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.

सदर टि्‌वटर हॅशटॅग मोहिमेच्या माध्यमातून तरी सरकारला या गरीब सोडतधारकांच्या भावना समजतील, अशी अपेक्षा ‘मनसे'चे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहरअध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केली. तसेच ‘सिडको'ने जर अत्यल्प घरांचे दर कमी नाही केले तर मनसे ‘सिडको'विरुध्द रस्त्यावर उतरेल, असा इशारा गजानन काळे यांनी दिला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारफुटीवर अनधिकृत गोशाळा