भोपाळ वायू गळती  दुर्घटनेची पुनरावृत्ती तळोजात करावयाची आहे का?

६ आठवड्यात सुधारणा न  के ल्यास प्रदुषणकारी कंपन्या बंद करण्याची शासनाला करणार सूचना 

खारघर ः तळोजा औद्योगिक क्षेत्रात रासायनिक उद्योगाद्वारे हवेत सोडल्या जाणाऱ्या वायू प्रदुषणामुळे परिसरातील रहिवाशी त्रस्त असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तुम्हाला भोपाळ औद्योगिक क्षेत्रात घडलेल्या वायू गळती सारख्या  दुर्घटनेची पुनरावृत्ती  करावयाची आहे का? सहा आठवड्यात सुधारणा न कल्यास प्रदुषण करणाऱ्या कंपन्या बंद करण्याची सूचना शासनाकडे केली जाईल, अशी तंबी लोक आयुक्त व्ही. एम. कानडे यांनी केल्यामुळे तळोजा परिसरात प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीत ९०० हुन अधिक लहान-मोठे कारखाने आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वाधिक केमिकल कंपन्या तळोजा औद्योगिक वसाहतीत असल्याचे सांगितले जाते. ‘तळोजा एमआयडीसी'मध्ये असलेल्या रसायन उद्योगांद्वारे या परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदुषण होत आहे. तळोजा औद्योगिक क्षेत्रातून रात्री सोडण्यात येणाऱ्या केमिकल्सच्या उग्रवासामुळे तळोजा, खारघर, रोडपाली, कळंबोली आणि जवळपास असलेल्या गावातील नागरिकांना त्रास होत असल्याची  तक्रार तळोजा मधील ‘आदर्श सामाजिक संस्था'ने मुंबई लोकायुक्तांकडे केली होती.

दरम्यान, यासंदर्भात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी लोक आयुक्त व्ही. एम. कानडे यांनी तळोजा औद्योगिक क्षेत्रात रासायनिक उद्योगाद्वारे हवेत सोडल्या जाणाऱ्या वायुच्या पातळीचे परीक्षण करण्यासाठी विशेष तपास पथक गठीत करुन  ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'ने प्रदुषण मोजमाप करणारे यंत्र बसवून त्यासंबंधीचा अहवाल तीन आठवड्यात सादर करण्याचे  आदेश दिले होते.

यानंतर ५ एप्रिल रोजी लोक आयुक्त कार्यालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी काही वकिलांची नेमणूक केली होती. यावेळी या वकिलांनी औद्योगिक वसाहत निर्माण होण्यापूर्वी पासून काही गावे आहेत, त्यांच्या तक्रारी नव्हत्या. शहरीकरणामुळे तक्रारी वाढ होत असून काही तक्रारदार आर्थिक हितासाठी कंपन्यांविरोधात तक्रार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी लोक आयुक्त कानडे यांनी नागरिकांच्या तक्रारीत वाढ होत असून तक्रार करणारे नागरिक आपला वेळ फुकट घालवतील का? अशा मुद्दा उपस्थित करुन तुम्हाला भोपाळ औद्योगिक क्षेत्रात घडलेल्या वायू गळती सारखी दुर्घटनेची पुनरावृत्ती करावयाची आहे का? असा प्रश्न केला. तसेच सदर प्रदुषकारी परिस्थितीमध्ये सहा आठवड्यात सुधारणा न केल्यास प्रदुषण करणाऱ्या कंपन्या बंद करण्याची सूचना शासनाकडे केली जाईल, अशी तंबीच लोक आयुवत कानडे यांनी संबंधित कंपन्यांना दिली. एकंदरीतच लोक आयुक्तांनी सज्जड दम भरल्यामुळे तळोजा औद्योगिक परिसरात प्रदूषण करणाऱ्या कंपन्याचे धाबे दणाणले आहे.

‘‘लोक आयुवतांकडील सुनावणीच्या वेळी ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या अधिकाऱ्यांनी औद्योगिक क्षेत्रातून समुद्र आणि खाडीत सोडणाऱ्या गॅस वाहिन्यांमधून काही ठिकाणी वायू गळती होत असून याकडे औद्योगिक कंपन्या दुर्लक्ष करीत असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्याचे समजतेे.''

औद्योगिक कंपन्यांमधून सोडला जाणाऱ्या घातक वायू प्रदुषणामुळे तळोजा परिसरातील गावे आणि खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे, आदि वसाहतीमधील रहिवाशांना त्रास होत आहे. वायू प्रदुषण तातडीने बंद झाले पाहिजे. तसेच तळोजा औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे स्थलांतर मुंबई परिसरात करण्यात यावे.
-राजीव सिन्हा, अध्यक्ष-आदर्श सामाजिक संस्था.

तळोजा  औद्योगिक वसाहतीत समस्या असून या विषयी लोक आयुक्तांना माहिती दिली आहे.
-सचिन आडकर, विभागीय अधिकारी-प्रदुषण नियंत्रण मंडळ, विभाग तळोजा.

तळोजा वसाहतीत काही आठ-दहा कंपन्या वायू प्रदुषण करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असतील तर त्या कंपन्यांवर ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'ने कारवाई करावी.
-सतिश शेट्टी, अध्यक्ष-तळोजा इंडस्ट्रिअल असोसिएशन. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

टि्‌वटर वर गाजला ##CidcoOverPricedHome हॅशटॅग