काचांवरील परावर्तीत होणाऱ्या प्रकाशामुळे अपघातांना निमंत्रण ?

इमारतींच्या काचांवर परावर्तीत होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळेअपघातांना निमंत्रण

नवी मुंबई : - नवी मुंबई शहरात उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत आणि या इमारती अधिक आकर्षक वाटण्यासाठी त्यावर काचा लावल्या आहेत. मात्र या काचा लावताना नियमाचे उल्लंघन होत असून सरसकट पूर्ण इमारतीला काचा लावल्या जात आहे आणि या काचांवर पडत असलेला सूर्यप्रकाश परावर्तीत होऊन अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकतो.त्यामुळे मानपाने अशा काचा लावण्यास अटकाव करावा अशी मागणी होत आहे.

नवी मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील  वाढत्या  इमारतींना काचा अथवा धातूची आवरणे लावण्याची फॅशन आली आहे. दिसायला अत्यंत आकर्षक आणि कमीतकमी देखभाल खर्च असलेल्या या काचांच्या आवरणाच्या इमारती परिसरात मात्र उष्णता निर्माण करत आहेत. वस्तुत: अशा काचांची गरज ही ध्रुवीय प्रदेशातील घरांसाठी आदर्श ठरते. मात्र भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातल्या देशात हे ग्लास फेकेड'चे आवरण म्हणजे परिसरातील तापमान वाढवण्याचा प्रकार ठरतो आहे. त्यामुळे अशा इमारतींवरील काचेच्या आवरणामुळे ती इमारत तापायला अधिकच मदत होते. 

वास्तविक, एनर्जी कॉन्झर्व्हेशन बिल्डींग कोडच्या मान्यतेनुसार, एखाद्या इमारतीला काचेचे आवरण लावण्यासाठी ४० टक्केच पृष्ठभाग वापरायची परवानगी असते. ६० टक्के भाग आवरण विरहीत ठेवायचा असतो. मात्र, बहुतांश इमारतींमध्ये या नियमाचे उल्लंघन झालेले दिसते. त्यामुळे काचांवरून परावर्तीत होणाऱ्या सूर्यकिरणामुळे डोळ्यांना दीपवणारा प्रकाश येतो त्यामुळे रस्त्यावर वाहने चालवताना वाहन चालकांना समोर काही दिसत नसल्याने अपघाताची शक्यता बळावते.

नवी मुंबई शहरात इमारतींना काचा लावताना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे महानगर पालिकेच्या निदर्शनास आणून दिले आहे. मात्र असे असून देखील शहरात परिस्थिती जैसे थे  वैसेच आहे. - मंगेश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भोपाळ वायू गळती  दुर्घटनेची पुनरावृत्ती तळोजात करावयाची आहे का?