व्याजदर वाढल्याने गृहखरेदीला चाप

मालमत्ता प्रदर्शनावर महापालिका विकास आराखड्याचे सावट

नवी मुंबई : विकासकांनी सिडकोकडून खरेदी केलेल्या भूखंडांवर नवी मुंबई महापालिकेने विकास आराखड्यात टाकलेले आरक्षण, तर विमानतळ प्राधिकरणाकडून नवी मुंबई विमानतळ लगतच्या परिसरातील इमारतीच्या उंचीवर टाकलेल्या मर्यादेमुळे नवी मुंबईतील विकासक चिंतीत आहे. परिणामी युडीसीपीआरनुसार चटईक्षेत्र उपलब्ध असूनसुध्दा त्याचा वापर करण्यास विकासक असमर्थ ठरत आहेत. त्यात केंद्र सरकारने व्याजदरात केलेल्या वाढीमुळे घर खरेदीसाठी ग्राहक येणार की नाही याची विकासकाला पडलेली चिंता. आदींचे सावट शुक्रवारपासून वाशी येथे सुरु होणा-या बीएएनएम आयोजित मालमत्ता प्रदर्शनावर पडल्याचे दिसून येते. बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई अर्थात बीएएनएम व क्रेडाईच्या वतीने २१ वे मालमत्ता प्रदर्शन यंदा ७ ते १० एप्रिल २०२३ दरम्यान वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात भरविण्यात आले आहे. यावर्षी साधारण १०० विकासकांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवल्याची माहिती बीएएनएमचे अध्यक्ष वसंत भद्रा यांनी दिली.

क्रेडाई बीएएनएम प्रदर्शनात घर खरेदी करणाऱया ग्राहकांना अत्याधुनिक मुलभूत सुविधा (शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, सुसज्ज उद्यान, पार्किंग, मार्केट) विकासक जवळच उपलब्ध करुन देणार आहे. सर्वसामान्य घर खरेदीदाराला नजरेसमोर ठेवून २० लाखापासून ते अत्याधुनिक सुविधा असणारे १५ करोड किंमतीपर्यंतचे लक्झरी फ्लॅटस् या मालमत्ता प्रदर्शनात विक्रीसाठी असणार आहेत. तसेच नागरिकांना घर खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करुन देणा-या विविध वित्तीय संस्थांचा सहभाग देखील या प्रदर्शनात असल्याचे वसंत भद्रा यांनी सांगितले.

मार्च २०२० मध्ये आलेल्या करोना महामारीच्या संकटामुळे त्यानंतरची २ वर्षे नवी मुंबईत मालमत्ता प्रदर्शन भरविले गेले नव्हते. त्याचा परिणाम नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांवर मोठ्या  प्रमाणात पडला होता. अनेक बांधकाम व्यावसायिक कर्जाच्या खाईत बुडाले गेले. अशा परिस्थितीत जानेवारी २०२२ मध्ये छोट्या  प्रमाणात मालमत्ता प्रदर्शन भरवून घर खरेदीदारांना नवी मुंबईकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला गेला.

दरम्यान, करोना महामारीतून सावरत असलेल्या नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांना गेले वर्षभर नवी मुंबई महापालिका व सिडको यांच्यातील नियोजन प्राधिकरणाच्या वादाचा फटका बसला आहे. शहराचा विकास आराखडा प्रसिद्ध करताना सिडकोने निविदेद्वारे विकलेल्या भूखंडांवर नवी मुंबई महापालिकेने आरक्षण टाकल्याने अनेक विकासक त्या भूखंडांचा विकास करु शकलेले नाहीत. परिणामी अनेक विकासक यावर्षीच्या मालमत्ता प्रदर्शनात आपले गृहप्रकल्प घेऊन सहभागी होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे कोरोना महामारीपूर्वी भव्यदिव्य स्वरूपात मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करणाऱ्या बीएएनएम व क्रेडाई संस्थेला करोना आपत्तीनंतर मात्र मालमत्ता प्रदर्शनाचे स्वरुप मर्यादित ठेवणे भाग पडले आहे. त्यात आता बांधकाम व्यावसायिकांच्या अनेक संघटना व ग्रुप  निर्माण झाल्याने प्रत्येकजण आपली वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करत असल्याने पहिल्यासारखे सर्व विकासक एकत्रित येऊन मालमत्ता प्रदर्शनात सहभाग घेत नसल्याचे दिसून येते.


दरम्यान, आता केंद्र सरकारने व्याज दरात वाढ केल्याने मालमत्ता खरेदी करणा-यांच्या मासिक हफ्त्यामध्ये (ईएमआय) वाढ झाल्याने घर खरेदीदारांना पण हात आखडते घ्यावे लागले आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईच्या काळात अगदी गरजवंतच घर खरेदीसाठी बाहेर पडू शकणार आहे.

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राजेश पाटील यांना गिरणा गौरव पुरस्कार