मालमत्ता कर विभागापाठोपाठ नगररचना विभागाची कर वसुलीत आघाडी

नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना विभागाची विक्रमी विकास शुल्क वसुली

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यावर्षी रेकॉर्ड ब्रेक उत्पन्नाची वसुली केल्यानंतर महापालिकेच्या नगर रचना विभागाने देखिल दिलेल्या सुधारित उद्दिष्टापेक्षा सुमारे ६६ कोटी ८१ लाख अधिक उत्पन्न वसुली करून एक इतिहास घडविला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ करिता नगर रचना विभागास विकास शुल्क अधिमूल्यापोटी २०० कोटी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु नगर रचना विभागाच्या अधिकारी व कर्मचारीवर्गाने मार्च अखेरपर्यंत केलेल्या मेहनतीमुळे विकास शुल्क अधिमूल्या पोटी २६६ कोटी ८१ लाख रुपये विकास शुल्क .वसूल करण्यात नगररचना विभागास यश आले आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या सन-२०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात मालमत्ता कर विभागाने आर्थिक उत्पन्न वसुली बाबत निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा १०६ कोटी ५० लाख रुपये अधिकचे जमा करण्यात यश मिळवले आहे. या आर्थिक वर्षात मालमत्ता कर विभागाने ६३२ कोटी ५० लक्ष रुपयांची विक्रमी कर वसुली केली आहे.

मालमत्ता कर विभागाच्या पाठोपाठ महापालिकेच्या नगर रचना विभागाने देखिल महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या सन -२०२२-२३ या आर्थिक वर्षात २०० कोटी रुपये शुल्क वसुलीचे उद्दिष्ट नगर रचना विभागाला देण्यात आले होते. मात्र ३१ मार्च २०२३ अखेर पर्यंत नगर रचना विभागाने २६६.८१ कोटी रुपये शुल्क वसुली केली आहे. त्यामुळे ६६.८१ कोटी रुपये अधिक वसुली करून, नगर रचना विभागाने इतिहास घडविला आहे. सदर नगर रचना शुल्क वसुलीची टक्केवारी १३३.४० इतकी आहे. महापालिकेचे आर्थिक उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत मालमत्ता कर आणि नगर रचना विभाग असल्याने त्याकडे प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रित केले होते, म्हणूनच मालमत्ता कर विभाग व नगर रचना विभागाने कर वसुलीत बजावलेल्या उत्तम कामगिरीमुळे नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली असल्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या विकास योजनेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत, सिडको व महापालिकेच्या विकास योजनेच्या तिढ्यातील अडथळ्यांवर मात करत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षापेक्षा २०९.१८  कोटी रुपये अधिक शुल्क वसुली करून नगर रचना विभागाने इतिहास घडविला आहे. विशेष म्हणजे करोना महामारीमुळे शहरातील विकास कामे ठप्प पडल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे उत्पन्न एप्रिल २०२० पासून पुढील दोन आर्थिक वर्षे अत्यल्पच होते.
आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये नगररचना विभागाला ९५ कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र वसुली फक्त ५९ कोटी होऊ शकली होती. त्यानंतर आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये नगर रचना विभागास १०० कोटी शुल्क वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र त्यावर्षी देखील नगर रचना विभाग अवघे ५७ कोटी ६३ लाख रुपये विकास शुल्क वसूल करू शकली होती. तर आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये नवी मुंबई महापालिकेने शहराची विकास योजना प्रसिद्ध केल्यानंतर सुरू झालेल्या  न्यायालयीन लढाईमुळे तसेच सिडको व नवी मुंबई महापालिकेत भूखंड विक्रीवरून निर्माण झालेल्या तिढ्यामुळे या शहरातील अनेक भूखंडांचा विकास रखडला होता. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विकासाला चालना देण्याचं मोठे आव्हान नगररचना विभागासमोर होते. या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर रचना विभागाचे सहायक संचालक सोमनाथ केकान व त्यांच्या टीमने गत तीन महिन्यात विशेष मेहनत करून विकास शुल्क वसुलीचे उद्दिष्ट गाठले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका करणार झाडांची नाहक कत्तल