शैक्षणिक शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास प्रारंभ - महापालिका आयुवत राजेश नार्वेकर

महापालिका द्वारे शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही चालू

तुर्भे ः नवी मुंबई महापालिका द्वारे राबवण्यात आलेल्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही चालू करण्यात आली आहे. पहिल्या टप्यात १५ कोटी ८१ लाख रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील विविध घटकातील इयत्ता १ ली ते महाविद्यालयीन शिक्षण घ्ोणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी सन २०२१-२२ साठी ३४ हजार १९९, सन २०२२-२३ या वर्षासाठी ३७ सहस्र १६५ अर्ज प्राप्त झाले आहेत. २ वर्षांच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी ३३ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे महापालिका उपायुवत (समाज विकास विभाग) श्रीराम पवार यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात सन २०२१-२२ या वर्षासाठी प्राप्त ३४ सहस्र १९९ अर्जांपैकी २० सहस्र ४७ विद्यार्थ्यांचे अर्ज संमत करण्यात आले आहेत. त्यांच्या बँक खात्यात १५ कोटी ८१ लाख २० हजार रुपये इतकी रक्कम हस्तांतरित करण्याची कार्यवाही चालू करण्यात आली आहे. तसेच ७७ विद्यार्थ्यांचे अर्ज अपात्र झाले असून, १४ सहस्र १११ विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने ते अर्ज दुरुस्तीसाठी परत पाठवण्यात आले आहेत. यासंदर्भात त्यांना एस.एम.एस. द्वारेही कळवण्यात आले आहे. अर्ज दुरुस्ती नंतर पडताळणीत अर्ज संमत होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित विद्यार्थी किंवा पालक यांनी या अर्जातील दुरुस्ती तातडीने करावी, असे आवाहन महापालिका उपायुक्त श्रीराम पवार यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरुध्द महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा