मुलीच्या लग्नासाठी अभय कुरुंदकरला पोलीस बंदोबस्तात जाण्यास मुभा

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण :

नवी मुंबई  : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर आणि महेश फळणीकर हे तीन दिवस जेलच्या बाहेर येणार आहेत. कुरुंदकरला स्वत:च्या मुलीच्या लग्नाला आणि फळणीकरला स्वत:च्या वडिलांच्या तेराव्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी पनवेल न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी.पालदेवार यांनी दिली आहे. या दोन्ही आरोपींना पोलीस बंदोबस्तात जाण्याची न्यायालयाने मुभा दिली असून या बंदोबस्ताचा खर्चही त्यांना करावा लागणार आहे. या कालावधीत त्यांनी कोणत्याही साक्षीदाराची भेट घेऊ नये, अशी सक्त ताकिद न्यायालयाने दिली आहे. हे दोन्ही आरोपी गेल्या पाच वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान या हत्याकांडातील दुसऱया क्रमांकाचा आरोपी राजू पाटील याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.  

अश्विनी बिद्रे यांची 11 एप्रिल 2016 रोजी अभय कुरुंदकर याने आपल्या सहकाऱयांच्या मदतीने हत्या केली होती. गुन्हा उशिराने दाखल झाल्यामुळे याप्रकरणी कुरुंदकरला तब्बल दीड वर्षाने 7 डिसेंबर 2017 रोजी तर राजू पाटील याला 10 डिसेंबर 2017 रोजी अटक झाली होती. या दोघांची कसून चौकशी झाल्यानंतर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांची नावे पुढे आली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना अनुक्रमे 20 आणि 26 फेब्रुवारी 2018 रोजी गजाआड केले. तेव्हापासून हे चारही आरोपी कैदेत असून गत पाच वर्षात एकाही आरोपीला एक दिवसाचाही पॅरोल मंजूर करण्यात आलेला नाही.

काही महिन्यांपूर्वी अभय कुरुंदकर याच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्याला कोणत्याही विधीला उपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाने दिली नव्हती. मात्र आता कुरुंदकरच्या मुलीचे लग्न आहे. त्यामुळे येत्या 23 ते 25 एप्रिलदरम्यान लग्नासाठी पोलीस बंदोबस्तात उपस्थित राहण्याची न्यायालयाने परवानगी दिली आहे. महेश फळणीकर याचे वडील मनोहर फळणीवर यांचे 25 मार्च रोजी निधन झाले आहे. त्यांच्या उत्तर कार्यासाठी महेश फळणीकर याला येत्या 5 ते 7 एप्रिलदरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी.पालदेवार दिली आहे. शनिवारी याबाबत पनवेल सत्र न्यायालयात सुनावणी झाली. याप्रसंगी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, आरोपींचे वकील विशाल भानुशाली आदी उपस्थित होते.  

राजू पाटीलच्या पदरी निराशा  
राजू पाटील यानेही जामीन मिळण्यासाठी पनवेल सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी सुरु असताना न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्याच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. या हत्याकांडप्रकरणी न्यायालयाने आतापर्यंत 75 साक्षीदार तपासले आहेत. आता तपास अधिका-यांची साक्ष सुरु झाली आहे.    

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर येथील ए.सी.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा रिदम्स-2023 हा सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात साजरा