कचरामुक्त नवी मुंबई शहरांचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून विविध कार्यक्रमांचे आयोजन

 ‘स्वच्छ, सुंदर, पर्यावरणशील नवी मुंबई'चा एकमुखाने गौरव

नवी मुंबई ः स्वच्छता कार्यातील महिलांचा सहभाग आणि त्यांचे नेतृत्व वृध्दींगत व्हावे यादृष्टीने ‘स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत देश पातळीवर अभिनव ‘स्वच्छोत्सव-२०२३' उपक्रम राबविला जात आहे. या अनुषंगाने कचरामुक्त शहरांचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने शून्य कचरा दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता संग्राम रॅली आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ५ हजारहून अधिकमहिला आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होत स्वच्छ, सुंदर, पर्यावरणशील नवी मुंबईचा एकमुखाने गौरव केला. याप्रसंगी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त सोमनाथ पोटरे, डॉ. श्रीराम पवार, मंगला माळवे, अंनत जाधव, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, अजय संख्ये, प्रवीण गाढे, शुभांगी दोडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. स्वच्छता संग्राम रॅली प्रसंगी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. महिला कोणतेही काम अत्यंत जबाबदारीने करतात. स्वच्छतेमध्ये तर महिलाच आघाडीवर असतात. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केलेला स्वच्छोत्सव यशस्वी करण्यासाठी स्वच्छता संग्राम रॅलीत एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांचे आणि मुलींचे कौतुक करीत आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई शहर महाराष्ट्रात नंबर वन आहेच; आता आपला उत्साह पाहून देशातही आपण नक्कीच नंबर वन होऊ, असा विश्वास व्यक्त केला.

 महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्वच्छतेचे आरोग्याशी असलेले नाते सांगत केंद्र सरकारने कचरामुक्त शहरांचे अभियान राबविताना ‘स्वच्छोत्सव'आयोजित करुन महिलांचे स्वच्छता कार्यातील महत्व अधोरेखित केले असल्याचे सांगितले. ‘स्वच्छोत्सव'च्या अनुषंगाने नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत नवी मुंबईतील झिरो वेस्ट बँक, ग्रो विथ म्युझिक आणि गेमिंग झोन बिलो पलायओव्हर या तिन्ही नाविन्यपूर्ण उपक्रमांचे देश पातळीवर कौतुक झाल्याचे सांगत ५ हजाराहून अधिक महिला आणि विद्यार्थ्यांनी यशस्वी केलेल्या या ‘स्वच्छता संग्राम रॅली'चीही विशेष दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी झेंडा दाखविल्यानंतर आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीचे नेतृत्व करणाऱ्या लेटस्‌ सेलिब्रेट फिटनेस सेवाभावी संस्थेच्या प्रमुख रिचा समीत यांचा यावेळी प्रातिनिधिक स्स्रुपात सन्मान करण्यात आला. गणपतशेठ तांडेल मैदानापासून सुरु झालेली ५ हजाराहून अधिक महिला, विद्यार्थिनी, विद्यार्थी यांची ‘स्वच्छता संग्राम रॅली'डी मार्ट समोरुन सेक्टर-४०,४२ मधील रस्त्याने सीवुडस्‌ ग्रँड सेंट्रल मॉल मार्गे नवी मुंबईचे आकर्षण केंद्र असलेल्या नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे पोहोचली. या रॅलीमध्ये स्वच्छता संदेशांचे फलक झळकवित स्वच्छ, सुंदर, प्लास्टिकमुक्त नवी मुंबईचा दमदार प्रचार करण्यात आला. त्यासोबतीने कचरा वर्गीकरण, कचऱ्याची विल्हेवाट, प्लास्टिक वापराला प्रतिबंध अशा स्वच्छताविषयक विविध घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुलीच्या लग्नासाठी अभय कुरुंदकरला पोलीस बंदोबस्तात जाण्यास मुभा