नवी मुंबई शहरात वाहतूक कोंडी पुन्हा वाढणार

मुंब्रा बायपास मार्गाच्या दुरुस्तीच्या कामासाठी वाहतूक वळवली नवी मुंबईमार्गे  

नवी मुंबई : मुंब्रा बायपास मार्गाच्या दुरुस्तीसाठी शनिवार दि.1 एप्रिलपासून मुंब्रा बायपास मार्ग पुर्णपणे बंद करुन त्या मार्गावरील वाहतुक नवी मुंबईतून ऐरोली रबाळेमार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईत वाहनांच्या संख्येत वाढ होऊन ऐरोली-रबाळे व महापे भागामध्ये वाहतुक कोंडी सदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक विभागाने ऐरोली-रबाळे व महापे मार्गे जाणाऱया जड अवजड वाहनांसाठी दररोज रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे. वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबतची अधिसूचना लागू केली आहे.  

मुंब्रा बायपास मार्गाची पुन्हा दुरुस्ती करण्यात येणार असल्यामुळे शनिवार दि.1 एप्रिलपासून मुंब्रा बायपास मार्ग पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी किमान दोन महिने व त्यापेक्षा अधिक काळ हा महत्त्वाचा रस्ता वातहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे जेएनपीटी कळंबोली तसेच दक्षिण भागातून पुणे मार्गे तळोजा कडून कल्याण फाटा व शिळफाटा मुंब्रा बायपास मार्गे नाशिक, गुजरात भिवंडी उत्तर भारतात जाणाऱ्या वाहनांना शिळफाटा येथून मुंब्रा बायपास कडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी सदर वाहनांना कळंबोली शिळफाटा येथून डावीकडे वळण घेऊन महापे   रबाळे एमआयडीसी मार्गे ऐरोली पटणी रोडने ऐरोली सर्कलवर मुलुंड ऐरोली ब्रिजमार्गे पुर्व द्रुतगती महामार्गावरुन ठाणे आनंद नगर येथून इच्छित स्थळी जाण्यास पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.  

त्याचप्रमाणे जेएनपीटी कळंबोली उरण मार्गे सायन पनवेल महामार्ग व ठाणे बेलापूर रोडने महापे ब्रिज कडून शिळफाटा मार्गे गुजरात, भिवंडी, नाशिक व उत्तर भारतात जाणाऱया सर्व प्रकारच्या वाहनांना शिळफाटाकडे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याऐवजी सदर वाहनांना सायन-पनवेल महामार्ग व ठाणे-बेलापूर मार्गाने पटणी चौक येथून ऐरोली सर्कलवरुन मुलुंड ऐरोली ब्रिज मार्गे पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे आनंद नगर येथून इच्छित स्थळी जाण्यास पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. कळंबोली, तळोजा, मुंब्रा मार्गावरील वाहतुक तसेच उरण जेएनपीटी वरील महापे मार्गावरील वाहतूक रबाळे, ऐरोली, मुलुंड मार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईत वाहनांच्या संख्येत वाढ होऊन ऐरोली-रबाळे व महापे भागामध्ये वाहतुक कोंडी सदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कचरामुक्त नवी मुंबई शहरांचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून विविध कार्यक्रमांचे आयोजन