सिडकोच्या मोकळ्या जागेत अनधिकृतपणे डेब्रीज टाकण्यास सांगणा-या डेब्रिज माफियांचा शोध सुरु
नवी मुंबई : उरण रोड लगत सिडकोच्या मोकळ्या जागेत अनधिकृतपणे डेब्रीज टाकणारे 10 डंपर परिमंडळ-1 चे पोलीस उपआयुक्ताच्या अधिपत्याखालील पथकाने शुक्रवारी पहाटे जप्त केले आहेत. या कारवाईत पोलिसांनी 10 डंबर चालकांना ताब्यात घेतले आहे. सदर डंपर चालक मुंबईतील डेब्रीज उरण रोड लगत आणुन टाकत असल्याचे चौकशीत आढळुन आले आहे. पोलिसांनी आता सदरचे डेब्रीज टाकण्यास सांगणा-या डेब्रिज माफियांचा शोध सुरु केला आहे.
उलवे भागातील वहाळ येथील साई मंदिरासमोरील रस्त्याच्या बाजुला असलेल्या सिडकोच्या जागेत काही व्यक्ती अनाधिकृतरित्या रेबीट,माती व दगड असे मानवी आरोग्यास धोकादायक असलेले डेब्रीज टाकत असल्याची माहिती मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने शुक्रवारी पहाटे प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्याबाबत शहानिशा केली असता, 10 डंपरमधून त्याठिकाणी अनधिकृत रेबीट, माती व दगड असे मानवी आरोग्यास धोकादायक असलेला डेब्रीज टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी डेब्रिजने भरलेले 10 डंपर व त्याच्यावरील 10 चालकांना ताब्यात घेतले. या सर्व डंपर चालकांविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात कलम 269, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या डंपर चालकांना मुबारक, शकिल, माऊली, अमित खारकर, विकी दापोलकर व इतरांनी सदरचे डेब्रीज उरण रोडलगत वहाळ, जांभुळपाडा व इतर मोकळ्या जागेत टाकण्यासाठी सांगितल्याचे तपासात आढळुन आले आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांची देखील धरपकड सुरु केली आहे. सदरची कारवाई एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहल गरड व त्यांच्या पथकाने केली.