शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
नवी मुंबई मालमत्ता कर विभागाकडून ६३३ कोटींचे प्राप्त
महापालिकेची रेकॉर्डब्रेक कर वसुली
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या इतिहासात गेल्या ३० वर्षामध्ये नवी मुंबई महापालिकेची मालमत्ता कर वसुली ६०० कोटी रुपयांच्या वर गेली आहे. विविध प्रकारच्या अडचणींवर मात करीत महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ६३३.१७ कोटी रवकमेचे उत्पन्न जमा केले आहे. मागील वर्षीपेक्षा सदरचे उत्पन्न १०७.१७ कोटींनी अधिक असून मालमत्ता कर विभागाने वर्षभरात जमा केलेल्या महसुलाचा तो आत्तापर्यंतचा विक्रम आहे. विशेष म्हणजे मालमत्ता कर वसुलीपोटी ६०० कोटींचा टप्पा आर्थिक वर्ष २०२२-२३ संपण्याच्या एक दिवस आधीच नवी मुंबई महापालिकेने पार केला होता. तर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ मार्च रोजी मालमत्ता कर वसुलीत अजून ३३ कोटींची भर घालण्यात मालमत्ता कर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि त्यांच्या टीमला यश आले. त्यामुळे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी समाधान व्यक्त करीत मालमत्ता कर विभागातील अधिकारी-कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ताकर वसुलीकडे नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष देण्यात आले होते. या अनुषंगाने मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी नियोजनबध्द काम करीत कर वसुलीच्या दृष्टीने उचललेल्या सुयोग्य निर्णयांमुळे आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत थकबाकीदारांसोबत संवाद साधून त्यांना मालमत्ता कर थकबाकी भरण्यास प्रोत्साहित केले. म्हणूनच महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मालमत्ता कर वसुली ६३३ कोटींच्या घरात पोहोचली आहे. मागील वर्षी महापालिकेने ५२६ कोटी इतका मालमत्ता कर जमा केला होता. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर विभागास ५७५ कोटी रुपये कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. सदर उद्दिष्ट गाठणे मालमत्ता कर विभागाला आव्हानात्मक होते. मात्र, त्याही परिस्थितीत दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ६० कोटीहून अधिक रक्कमेची कर वसुली करुन नवी मुंबई महापालिकेने ६३३.१७ कोटी रुपयांची अधिक रेकॉर्डब्रेक कर वसुली केली आहे.
दुसरीकडे दोन वर्षाचा कोरोना प्रभावित काळ आणि नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी १५ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत मालमत्ताकर थकबाकीच्या दंडात्मक रकमेवर ७५ टक्के सवलत देणारीअभय योजना लागू करून नागरिकांना दिलासा दिला होता. पुढे १६ ते ३१ मार्च या कालावधीत सदर सवलत ५० टक्के करण्यात आली होती. या ‘अभय योजना'ला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत १३० कोटींहून अधिक रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा केली.
याशिवाय करनिर्धारणा न झालेल्या एमआयडीसी आणि निवासी क्षेत्रातील मालमत्तांना कराच्या जाळ्यात आणण्याचे नियोजनबध्द काम करण्यात आले. तसेच मोठ्या प्रमाणात थकबाकी असणाऱ्या मालमत्ताकर थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित करुन अधिकाधिक महसूल वसूल करण्याकडे बारकाईने लक्ष देण्यात आले. याचाच परिणाम म्हणून मागील वर्षीपेक्षा यावर्षी १०७.१७ कोटी इतका अधिकचा मालमत्ता कर जमा करण्यात विभागाला यश आले.
दरम्यान, ३० मार्च रोजी रामनवमीच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही नागरिकांना कर भरणा सुलभ व्हावा म्हणून महापालिकेची सर्व कार्यालये मालमत्ता कर भरण्यासाठी खुली ठेवण्यात आली होती. यावेळी एका दिवसात १५ कोटी रक्कमेचा मालमत्ताकराचा भरणा करण्यात आला. त्याचप्रमाणे ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीही १८.९२ कोटी इतकी रक्कम मालमत्ता करापोटी जमा झालेली आहे.