शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
मनोऱ्याची रचना पक्षी पाहणाऱ्या लोकांसाठी नव्हे तर सुरक्षा रक्षकांसाठी ?
महापालिकेचा ‘पलेमिंगों वॉच टॉवर'मध्ये त्रुटी
नवी मुंबई ः एनआरआय जवळील डीपीएस तलाव परिसरामध्ये पलेमिंगोंच्या संरक्षणाविषयी पर्यावरणवाद्यांनी केलेल्या सुचनांचा स्वीकार करीत नवी मुंबई महापालिकेने सर्विस रोडवर निरीक्षण मनोरा (वॉच टॉवर) उभारला आहे.
सदर मनोऱ्याच्या सर्वात वरच्या भागावरुन तलावामधील पक्ष्यांना आपण न्याहाळू शकतो असे सांगत ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी दलदलीच्या भागात नेहमी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु, मनोरा अतिशय लहान असल्यामुळे तो अपुरा पडतो, पायऱ्या अरुंद असून त्याच्या डिझाईनमध्येच त्रुटी आहेत. त्यामुळे मनोऱ्याची रचना पक्षी पाहणाऱ्या लोकांसाठी नव्हे तर सुरक्षा रक्षकांसाठी करण्यात आली असावी, असे बी. एन. कुमार म्हणाले. तरीसुध्दा उत्साही लोक आपल्या जीव धोक्यात घालून पाणथळ क्षेत्रातील स्थलांतरीत पक्षांना जवळून पाहण्यासाठी जातात. पलेमिंगो पक्ष्यांना दगड मारुन त्यांना त्यांच्या घरट्यामधून उडायला भाग पाडून त्यांच्यासोबत सेल्फी घेणाऱ्या लोकांना बघणे अतिशय वेदनादायक बाब आहे, असे कुमार यांनी स्पष्ट केले.
सदर प्रकार पलेमिंगो पक्षांसाठी देखील घातक आहे. जर नागरिक त्यांच्या जवळ जात असतील तर त्यामुळे त्यांच्या शांततेचा भंग होतो, असे पर्यावरणवादी ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे नागरिक पक्षी निरीक्षण मनाऱ्याचा वापर करतील आणि तळ्याच्या परिसरात घुसखोरी करणार नाहीत, असे नाडकर्णी म्हणाल्या. त्यामुळेच लोकांना तळ्यामध्ये जाण्यासाठी प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने महापालिकेने पाणथळ क्षेत्राच्या सभोवती मजबूत कुंपण घालण्याची विनंती ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने केली आहे.
व्यावसायिक छायाचित्रकार शक्तीशाली झूम आणि वाईड-अँगल लेन्सेसचा कैमेरा ट्रायपॉडसह वापर करतात. ते पक्षांच्या जवळ जाण्यासाठी दलदलीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालण्याऐवजी वॉच टॉवरचा उपयोग करुन फोटो घेऊ शकतील, असे ‘पारसिक ग्रीन्स'चे विष्णू जोशी म्हणाले. नवी मुंबई महापालिकेने सदर तलाव परिसरात सतर्कता चिन्हे लावली आहेत. पण, तलावाची सीमा खुली असल्यामुळे सदर चिन्हे निरर्थक ठरत आहेत, अशी बाब विष्णू जोशी यांनी अधोरेखीत केली आहे.