नवी दिल्ली येथे विशेष स्वच्छोत्सव कार्यशाळा संपन्न

नवी मुंबईतील स्वच्छता उपक्रमांची दिल्लीत प्रशंसा

नवी मुंबई ः ‘शून्य कचरा दिन'चे औचित्य साधून इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे स्वच्छोत्सव-२०२३ अंतर्गत केंद्रीय नागरी विकास-गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष कार्यशाळा संपन्न झाली. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवसानिमित्त कचरामुक्त शहरासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना या विषयावर आयोजित कार्यशाळेमध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कचरामुक्त शहरासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम या
चर्चासत्रात सहभागी होत महापालिकेच्या वतीने ३ वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना मांडल्या. आयुक्त नार्वेकर यांनी मांडलेल्या तिन्ही अभिनव संकल्पनांची राष्ट्रीय पातळीवर प्रशंसा झाली.

महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग आणि त्यांचे नेतृत्व वृध्दींगत होण्यासाठी ‘स्वच्छोत्सव-२०२३'चे राष्ट्रीय पातळीवर आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये महापालिका उत्साहाने सहभागी झालेली आहे. देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहूमान संपादन करताना लोकसहभागावर विशेष लक्ष देत महापालिकेने स्वच्छतेमधील नवनवीन संकल्पनांचा उपयोग नेहमीच केलेला आहे. या अनुषंगाने कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार मानांकन प्राप्त महापालिकेच्या वतीने कचरामुक्त शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या ३ नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सादरीकरणाद्वारे दिली. यामध्ये पहिला उपक्रम म्हणजे शाळाशाळांमधून राबविण्यात येत असलेली ‘ड्राय वेस्ट बँक' अशी अभिनव संकल्पना. या उपक्रमांतर्गत सुक्या कचऱ्याची योग्य रितीने विल्हेवाट लावण्याची सवय शालेय विद्यार्थ्यांमध्ये रुजवून त्यांच्यावर नकळतपणे स्वच्छतेचा संस्कार केला जात आहे. नागरी विकास-गृहनिर्माण विभागाच्या सचिव रुपा मिश्रा यांनी सदर कार्यशाळेत संपूर्ण वेळ उपस्थित राहून देशभरात सुरु असलेल्या स्वच्छता विषयक विविधांगी उपक्रमांची माहिती जाणून घेतली.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आपल्या सादरीकरणात ‘संगीतासह विकास' अर्थात ‘ग्रो विथ म्युझिक' या दुसऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती देताना संगीताच्या माध्यमातून स्वच्छतेचा संस्कार करण्याची आगळी-वेगळी संकल्पना मांडली. त्याचप्रमाणे उड्डाणपुलाखालील जागांचे सुशोभिकरण करुन तसेच त्याठिकाणी विविध खेळांच्या सुविधा उपलब्ध करुन देऊन त्याचा कायापालट करण्याच्या सानपाडा उड्डाणपुलाखाली राबविलेल्या ‘गेमींग झोन'चीही माहिती आयुक्तांनी छायाचित्रांसह दिली. उड्डाणपुलाखालील अस्वच्छता दूर करुन त्या मोकळ्या जागेत छोटेखानी क्रीडा संकुल उभे करण्याच्या नवी मुंबई महापालिकेच्या सदर उपक्रमाचे राष्ट्रीय स्तरावर कौतुक करण्यात आले.

‘युथ वर्सेस गार्बेज' या संकल्पनेस अनुसरुन राबविण्यात आलेल्या ‘इंडियन स्वच्छता लीग'मध्ये सर्वाधिक युवक सहभागाचा राष्ट्रीय प्रथम क्रमांकाचा सन्मान महापालिकेला प्राप्त झाला असून आता ‘स्वच्छोत्सव'मध्येही व्यापक
महिला सहभागाच्या अनुषंगाने महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. दरम्यान, नवी दिल्लीतील विशेष कार्यशाळेतही महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कचरामुक्त शहरासाठी महापालिकेने राबविलेल्या नाविन्यपूर्ण
उपक्रमाच्या सादरीकरणाचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक झाले. यावेळी आयुक्तांसह शहर अभियंता संजय देसाई आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘अन्न सुरक्षा-मानदे प्राधिकरण'तर्फे पाच लाखांचे पारितोषिक जाहीर