महापालिका तर्फे महिला स्वच्छतादुतांचा विशेष सन्मान

३२ महिला स्वच्छताकर्मींना ‘हिरकणी' पुरस्कार

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या सहयोगाने हिरकणी फाऊंडेशन आणि लेक माहेरचा कट्टा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सीबीडी मधील वारकरी भवन येथे नवी मुंबईची हिरकणी या स्वच्छतादुतांच्या विशेष सन्मान करण्यात आला. महापालिकेच्या ३२ महिला स्वच्छताकर्मींना मानाची साडी, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, ‘ॲन्टी करप्शन ब्युरो'च्या नवी मुंबई विभाग उपअधीक्षक ज्योती देशमुख, राज्यकर आयुक्त विभागाच्या अधिकारी स्वाती थोरात, वन विभागाच्या अधिकारी सपना बिरारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल माने आणि इतर मान्यवरांनीही उपस्थित सदर स्वच्छतादुतांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक विजय नाईक यांनी उपस्थितांना स्वच्छतेविषयी माहिती देत सामुहिकरित्या स्वच्छतेची शपथ ग्रहण केली. या निमित्ताने विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या २४ सेवाभावी संस्थांनाही गौरविण्यात आले. ‘गौरव तुमचा, आनंद आमचा' असे म्हणत ‘हिरकणी फाऊंडेशन'च्या अध्यक्ष जयश्री शेलार आणि ‘लेक माहेरचा कट्टा ग्रुप'च्या प्रमुख सारिका डहाणे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत उत्साहाने सदर समारंभाचे आयोजन केले होते. दरम्यान, नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेमधील मानांकनात येथील स्वच्छताकर्मींचा सर्वाधिक महत्वाचा वाटा असून त्यामध्ये स्वच्छताकर्मी महिलांचीही महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे महिला स्वच्छताकर्मींच्या कार्याचा बहुमान करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक करीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी यामुळे हिरकणी असणा-या आमच्या महिला स्वच्छताकर्मींना अधिक चांगले काम करण्याचे प्रोत्साहन मिळेल असे सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिलेल्या ५७५ कोटींच्या उद्दिष्टापेक्षा महापालिकाकडून अधिक कर वसूल -आयुवत नार्वेकर