बेलापूरच्या रामनवमी यात्रेला अलोट गर्दी  

नवी मुंबईत राम जन्मोत्सव उत्साहात संपन्न

नवी मुंबई : चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्रीराम जन्मोत्सव सोहळा गुरुवारी नवी मुंबईतील बेलापूर गावात मोठ्या  थाटामाटात संपन्न झाला. नवी मुंबई परिसरातलं ऐतिहासिक व तितकंच महत्वाचं गाव म्हणून बेलापूर गावची ख्याती आहे. अनेक भाविकांच्या मनात घर करुन राहिलेलं ठाणे-बेलापूर पट्टीतील हे गाव खास करुन ओळखलं जात ते इथं साज-या होणा-या राम-मारुती जन्मोत्सवाच्या यात्रेमुळे श्रीराम जन्मोत्सवाची परंपरा या गावानं १६१ वर्षापासून आजतागायत जपली आहे.  

आजच्या फेस्टिव्हलच्या जमान्यातही नितांत श्रद्धा आणि साधेपणाने साजरा होणा-या बेलापूरच्या राम-मारुती जन्मोत्सवाने आपली मराठमोळी परंपरा जपली आहे. ठाणे, मुंबईसह नवी मुंबईत नव्याने रहायला येणा-या नागरिकांनी या उत्सव सोहळ्याला आवर्जुन भेट दिल्याची माहिती श्री राम मारुती जन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर-पाटील यांनी दिली.    

श्रीराम जन्मोत्सवासाठी अख्खं बेलापूर गांवच नव्हे तर आजुबाजुचा परिसरही सजविण्यात आला होता. गुरुवारी राम जन्म झाल्यानंतर बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर दिवाळे गाव इथल्या छाया कला सर्कलच्या ब्रास बॅण्ड पथकाने सुमधूर गीते सादर करुन श्रीराम चरणी आपली सेवा अर्पण केली. त्यानंतर बेलापूर पंचक्रोशीतील भजनी मंडळ दिवसभर विविध प्रकारची भजने सादर करुन रामरायापुढे आपली सेवा बजावत होते. याशिवाय भव्य लॉटरी, कुस्त्यांचा जंगी फड असा बहुरंगी कार्यक्रम बेलापूरच्या श्रीराम-मारुती उत्सव मंडळाने आखला होता. कुस्ती प्रेमिकांसाठी मानाचा समजला जाणारा बेलापूर केसरी हा किताब आणि ढाल या कुस्त्यांमध्ये सर्वश्रेष्ठ ठरणाऱ्या मल्लास संस्थेतर्फे बहाल करण्यात आला. राष्ट्रीय किर्तन भूषण ह.भ.प. राजेंद्र बुवा पाडुरंग मांडेवाल यांचे श्रीराम जन्म सोहळ्याचे वर्णन गेले नऊ दिवस उपस्थित श्रोतेगणांना मंत्रमुग्ध करत आहे.  श्रीराम जन्म सोहळ्यास बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार, माजी नगरसेविका पुनम पाटील, आदिंसह हजारो रामभक्त यावेळी उपस्थित होते.  

दरम्यान, बेलापूर पंचक्रोशीतील नागरिकांना जितकी ओढ राम जन्मोत्सवाची असेत तीतकीच ओढ हनुमान जयंतीची देखील असते. हनुमान जयंतीपर्यंत रोज हा किर्तन सोहळा बेलापूर गावात संपन्न होणार असून या उत्सवाची संगात 6 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी होणार आहे.    

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हार्टफुलनेस वेलनेस संस्था आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांचा सन्मान