आ.मंदाताई म्हात्रे करणार ‘गौरव यात्रा'चे नेतृत्व

रविवारी ‘वीर सावरकर गौरव यात्रा'चे आयोजन

नवी मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी आजच्या पिढीला माहिती होण्यासाठी येत्या २ एप्रिल २०२३ रोजी ‘बेलापूर'च्या आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर पामबीच मार्ग ते छत्रपती शिवाजी महाराज चौक-वाशी पर्यंत ‘वीर सावरकर गौरव यात्रा' काढण्यात येणार आहे, अशी माहिती नवी मुंबई भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने बेलापूर येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली. याप्रसंगी आ. सौ. मंदाताई म्हात्रेे, ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, माजी विरोधी पक्षनेत्या सौ. सरोज पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख किशोर पाटकर, रोहिदास पाटील, पांडुरंग आमल, आदि उपस्थित होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ‘स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर गौरव यात्रा'ची घोषणा केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे नवी मुंबईत देखील सदर गौरव यात्रा निघणार आहे, अशी माहिती आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.  या गौरव यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील विविध पैलुंसह माहिती प्रदर्शनाद्वारे दाखविली जाणार आहे. स्वातंत्र्य लढ्यातील सावरकरांचे अभूतपूर्व योगदान समाजातील सर्व घटकांतील वर्गापर्यंत पोहोचविण्याचे कार्य यानिमित्ताने होणार आहे, असे आमदार सौ. म्हात्रे म्हणाल्या. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या विषयी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. त्याबाबत त्यांच्या घटक पक्षातही एकमत नाही. या प्रश्नावर स्वतः खा. शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागत आहे. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या विषयी केलेले वक्तव्याच्या अनुषंगाने आजच्या पिढीला सत्य परिस्थिती सांगण्यासाठी वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

बेलापूर विधानसभा क्षेत्रात निघणारी गौरव यात्रा महापालिका मुख्यालया समोरील श्री गोवर्धनी माता मंदिराच्या प्रवेशद्वारापासून निघणार असून ती पामबीच मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत काढण्यात येणार आहे.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सावरकर यांच्या विषयी समग्र माहिती देण्यात आल्यावर यात्रेची सांगता होणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लवकरच महामार्गांवर टोल नावयांऐवजी उपग्रह-आधारित भाडे संकलनाची प्रक्रिया