बांधकाम व्यावसायिक सावजीभाई मंजेरी यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या मुख्य आराेपी अटक

बिल्डर सावजीभाई हत्याकांड प्रकरणातील पाचवा आरोपी अटकेत  

नवी मुंबई : नेरुळ येथील सेक्टर-6 येथे 15 मार्च रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिक सावजीभाई मंजेरी यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या पाचव्या आरोपीला नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे. रफीक अहमद (40) असे या पाचव्या आरोपीचे नाव असून तो या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचे व त्यानेच सावजीभाई यांच्या हत्येची योजना आखल्याचे तपासात आढळुन आले आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बांद्रा येथे वेल्डरचे काम करणाऱया आणि खेरवाडी येथे राहणाऱया रफिक अहमदला सावजीभाई यांच्या हत्येची 25 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. त्यांनतर रफिक अहमदने गवंडी काम करणाऱया त्याच्या ओळखीतल्या राहुलला या हत्येची सुपारी दिली होती. त्यानंतर राहुलने त्याच्या हाताखाली काम करणाऱया बिहारमधील तीन जणांना या हत्येची सुपारी दिली होती. त्यातील एकाने सावजीभाई मंजेरी यांची रेकी केली होती, एक बाईक चालवत होता. तर तिसऱयाने सावजीभाई यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.  

आरोपी रफिक अहमद याला सोमवारी नेरुळ येथून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. न्यायालयाने त्याला 4 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांनी प्रथम मेहेक जयराजभाई नारिया (28) याला सावजीभाई यांच्या हत्येनंतर 18 मार्च रोजी गुजरातमधून पकडले होते. त्याने मंजेरीच्या हत्येची सुपारी रफिक अहमद याला दिली होती. तर राहुलने कौशलकुमार विजेंद्र यादव (18), सोनूकुमार विजेंद्र यादव (23) आणि गौरवकुमार विकास यादव (24) या तिघांना 10 लाखांची सुपारी दिल्याचे तपासात आढळुन आले आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बांधकाम व्यावसायिक सावजीभाई मंजेरी हे हे नेरुळ सेक्टर-6मध्ये दररोज मित्राला भेटायला जात होते. सावजीभाईंच्या या दिनक्रमाची माहिती आरोपींना मिळाली होती. नेरुळ सेक्टर-6 मधुन बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग असल्याने येथून पामबीच मार्गावर तसेच राजीव गांधी उड्डाणपुलावरुन थेट सायन पनवेल मार्गावर जाता येऊ शकते. हत्येनंतर या मार्गावरुन पळून जाण्यास सुलभ होईल याची  कल्पना असल्याने आरोपींनी सावजीभाई यांच्या हत्येसाठी नेरुळ सेक्टर-6 ची निवड केल्याचे तपासात आढळुन आले आहे.  

अटक आरोपी तपासात सहकार्य करत नसल्यामुळे रफिक अहमदला प्रत्यक्षात किती पैसे मिळाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अटक केलेल्या सर्व आरोपींची एकत्रित चौकशी करुन संपूर्ण घटनेची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अशोक पालवे यांना अभिनयाचे प्रथम पारितोषिक