‘डी. वाय. पाटील विद्यापीठ'चा दीक्षांत सोहळा संपन्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विजय दर्डा यांना डॉवटरेट प्रदान

नवी मुंबई ः नेरुळ येथील ‘डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ'चा १७ वा दीक्षांत सोहळा २८ मार्च रोजी संपन्न झाला. या दीक्षांत सोहळ्यात सामाजिक, वैद्यकीय सेवा आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील सेवेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसेच सामाजिक कार्यासाठी ‘लोकमत ग्रुप'चे चेअरमन विजय दर्डा यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट (डी.लिट) प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी ‘डी. वाय. पाटील विद्यापीठ'चे कुलपती तथा अध्यक्ष डॉ. विजय पाटील, प्र. कुलपती शिवानी पाटील, कुलगुरु वंदना मिश्रा चतुर्वेदी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजीराव शिंदे, पत्नी लता शिंदे, विभागीय आयुवत डॉ. महेंद्र कल्याणकर, ठाणे महापालिका आयुवत अभिजीत बांगर, नवी मुंबई महापालिका आयुवत राजेश नार्वेकर, अतिरिवत आयुवत सुजाता ढोले, आदि उपस्थित होते.

प्राचीन भारत जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी प्रसिध्द होता. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, ओदंतपुरी आणि सोमपुरा अशी प्रसिध्द विद्यापीठे होती. जिथे हजारो वर्षांपासून जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक शिक्षणासाठी येत असत. आजचे उच्च शिक्षण त्या विद्यापीठांच्या उंचीवर नेऊ शकतो का? याचा विचार करायला हवा, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी व्यक्त केले.

दीक्षांत समारंभ विद्यार्थ्यांसाठी खास दिवस असतो. पदवी घेतल्यानंतर आजपासून विद्यार्थी नवीन आयुष्यात पाऊल टाकणार आहेत. डी.वाय. पाटील विद्यापीठाची सतत वाढत जाणारी प्रगती शिक्षणविश्वात नवा इतिहास रचत आहे. विद्यापीठातील सर्व विद्याशाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे शिखर गाठण्याची संधी मिळत आहे. विद्यापीठात शिकण्याबरोबरच मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी सुरु असलेले उपक्रमही उल्लेखनीय आहेत. क्रीडा विश्वात जागतिक स्तरावर भूमिका बजावण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे, असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले. डी. वाय. पाटील विद्यापीठाने यापूर्वी अनेक महान व्यक्तींना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले आहे. त्यांच्या यादीत आज माझ्यासारखा कार्यकर्ता सामील झाला असून ती माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केल्या. कौटुंबिक जबाबदारीमुळे मला शिक्षण घ्ोता आले नाही. परंतु, नुकतेच मी माझे बी.ए. शिक्षण पूर्ण केले आहे. यापुढील काळातही आणखी अनेक गोष्टी करायच्या आहेत. इतके वर्ष समाजात काम करताना मला जगाच्या विद्यापीठाने खूप काही शिकवले. सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकवली ती म्हणजे विनम्रता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी शिकवण दिल्याप्रमाणे लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळी मिळालेल्या पदाचा, जबाबदारीचा वापर सर्वसामान्यांच्या अडचणीच्या, संकटाच्या काळात मदतीसाठी करणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

डी. वाय. पाटील महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या शिक्षण क्षेत्रातले दीपस्तंभ आहेत. शिक्षणाला खऱ्या अर्थाने एका ठराविक साच्यातून बाहेर आणण्याचे काम त्यांनी केले. २०-२२ वर्षांपूर्वी डी. वाय. पाटील विद्यापीठाची छोटीशी सुरुवात नेरुळमध्ये झाली. या विद्यापीठामुळे या भागाचा चेहरा मोहरा बदलला असून एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर मला मिळालेला डि.लिट पदवीचा सन्मान प्रतिष्ठतेचा आणि प्रेरणादायी आहे. समाजासाठी काम करण्याची प्रेरणा बाबुजींमुळे मिळाली. त्यामुळे या महत्वाच्या प्रसंगी त्यांची आठवण येत आहे. समाजाच्या विकासासाठी काम करण्याची तसेच समाजाला न्याय आणि समतेचा आधार मिळवून देण्यासाठी प्रेरणा देणारा सदर सन्मान आहे, असे विजय दर्डा यांनी सांगितले. यावेळी कुलपती डॉ. विजय पाटील यांनी प्रास्तविकातून विद्यापीठाची माहिती दिली. प्र.कुलपती शिवानी पाटील यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल वाचन केले. तर कुलगुरु चतुर्वेदी यांनी दीक्षांत समारंभाचे संचालन केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘चैत्र नवरात्रोत्सव-२०२३'मध्ये आदेश बांदेकर यांचा भोंडला आणि मराठमोळा दांडियाचे सादरीकरण