पोलीस अधिकाऱ्यांसाठी वाशीत कार्यशाळेचे आयोजन

 सायबर गुन्हे उघड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान -पोलीस आयुवत मिलिंद भारंबे

 नवी मुंबई ः इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वापराबद्दल पुरेसे ज्ञान नसलेल्या व्यक्तींना सायबर गुन्हेगारांकडून गंडा घातला जातो. अनेकदा उच्चशिक्षित व्यक्ती देखील सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. कोणत्याही लिंकवर गोपनीय माहिती शेअर केल्याने तसेच मोफतचे काही तरी मिळवण्याच्या प्रयत्नात नागरिक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. येत्या काळात सायबर गुन्हे अधिक वाढण्याची शक्यता असल्याने ते उघड करण्यासाठी पोलिसांनी सक्षम होणे आवश्यक आहे. तसेच अशा गुन्ह्यातून स्वतःला वाचवण्यासाठी नागरिकंनी देखील सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी वाशी येथे व्यक्त केले.  

वाढत्या सायबर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना अद्ययावत करण्याच्या उद्देशाने वाशी गांव येथील भारती विद्या भवन येथील केंद्रात नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांसाठी पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्‌घाटन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते २७ मार्च रोजी संपन्न झाले. यावेळी आयुवत भारंबे यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कार्यशाळेचे महत्व विशद केले. याप्रसंगी सह-आयुक्त संजय मोहिते यांच्यासह इतर मार्गदर्शक उपस्थित होते.  

दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच आहे. मात्र, अशा गुन्ह्यात लुटला गेलेला पैसा सहसा परत मिळत नाही. त्यामुळे सायबर गुन्ह्यांची कौशल्यपूर्ण उकल करुन गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनाही अद्ययावत आणि प्रशिक्षित असणे गरजेचे असल्याचे पोलीस आयुवत भारंबे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सायबर गुन्हेगारांची गुन्हे करण्याच्या बदलणाऱ्या कार्यपध्दती याबाबत माहिती दिली. तसेच अद्ययावत होत असलेल्या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करणाऱ्यांकडून सायबर गुन्हे केले जात असल्याचे आणि त्यात अल्पवयीन मुलांसह तरुणांचा समावेश दिसून येत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. त्यामुळे येत्या काळात सायबर गुन्हे अधिक वाढण्याची शक्यता असल्याने ते उघड करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असल्याचेही पोलीस आयुवत मिलिंद भारंबे यावेळी म्हणाले.


सदर कार्यशाळेत पोलिसांना डिजीटल फॉरेन्सिक आणि सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन दिले जाणार असून याचा फायदा सायबर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना निश्चितच होईल, असा विश्वास भारंबे यांनी व्यक्त केला. सायबर गुन्ह्याांचा तपास करण्यासाठी मुख्यालयात असलेल्या सायबर सेल मधून केवळ मोठ्या आणि गंभीर सायबर गुह्यांचा तपास केला जाणार आहे. तर छोट्या स्वरुपातील सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात नेमण्यात आलेल्या सायबर पथकाकडून हाताळले जाणार असल्याचे मिलिंद भारंबे यांनी स्पष्ट केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नोड, गांवठाण, एमआयडीसी आणि झोपडपट्टी विभागामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याची मागणी