क्षयरोग संपविण्याचा नवी मुंबईत निर्धार

होय, आपण क्षयरोग संपवू शकतो !

नवी मुंबई ः २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून क्षयरोगाविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने क्षयरोगाकडे लक्ष वेधून घेत क्षयरोग निर्मुलनाविषयी महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला जात असून प्रत्येक वर्षी जागतिक स्तरावर घोषवाक्य प्रसारित करण्यात येते. यावर्षी ‘होय, आपण क्षयरोग संपवू शकतो (भे!, ेंा ण्ीह िंह्‌ ऊँ)' या घोषवाक्यास अनुसरुन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोग आपण संपवू शकतो, असा विश्वास निर्माण करणारे विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये घणसोली गावामध्ये स्थानिक नागरिक तसेच महापालिका शाळा क्र.४२ मधील १०० हून अधिक विद्यार्थीनींनी सहभागी होत क्षयरोगाविषयी रॅलीद्वारे जनजागृती केली. शहर क्षयरोग अधिकारी डॉ. धनवंती घाडगे तसेच घणसोली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली आयोजित या रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

जनजागृतीकरिता मनोरंजनातून प्रबोधन करणारे पथनाट्य प्रभावी माध्यम असल्याने सीवुडस्‌ ग्रॅड सेंट्रल मॉल समोर, ऐरोली समता नगर येथे, वाशी रेल्वे स्थानकासमोर, तुर्भे नाका येथे तसेच सीबीडी-बेलापूर मार्केट येथे वर्दळीच्या ठिकाणी क्षयरोगाविषयी जनजागृती करणारी पथनाट्ये सादर करण्यात आली.

अशाच प्रकारची अंगभूत कलागुणांना उत्तेजन देणारी रांगोळी स्पर्धा वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये २७ जणांनी भाग घेत क्षयरोगाविषयी जनजागृती करणाऱ्या रांगोळ्या संदेशासह रेखाटल्या. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रांगोळी स्पर्धेचे परीक्षण केले. यावेळी उत्तम रांगोळी काढणाऱ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. महापालिकेने विविध उपक्रम आयोजित करताना २३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये क्षयरुग्णांच्या विशेष बैठका आयोजित करुन त्यांना वैद्यकीय अधिकारी तसेच टिबी चॅम्पियन यांनी क्षयरोगाविषयी आवश्यक माहिती देऊन क्षयरोगावरील उपचार पूर्ण करण्यास प्रेरित केले. त्याचप्रमाणे सार्वजनिक रुग्णालय वाशी, नेरुळ आणि ऐरोली येथील अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांमधील कर्मचारी यांना क्षयरोगाविषयी माहिती देण्यात आली. तसेच जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारासाठी आणण्याकरिता प्रेरीत करण्यात आले.

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत उत्कृष्ट काम करणारे ५ औषध निर्माता, ५ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि ५ टिबी हेल्थ व्हिजीटर यांना सन्मानचिन्ह प्रदान करुन त्यांच्या सेवाभावी कार्याचा यथोचित सन्मान करण्यात आला.
अशा प्रकारे विविध उपक्रमांच्या आयोजनातून ‘होय, आपण क्षयरोग संपवू शकतो' असा विश्वास क्षयरुग्णांच्या, त्यांच्या नातेवाईकांच्या आणि नागरिकांच्या मनात निर्माण करण्यासाठी महापालिकेमार्फत यशस्वी प्रयत्न करण्यात आले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

केवळ १०० रुपयांत १ किलो रवा, १ किलो साखर, १ किलो डाळ, १किलो तेल वाटप ; आनंदाचा शिधा