राम जन्मोत्सवासाठी सजले बेलापूर

 

नवी मुंबईत राम जन्मोत्सवाची जोरदार तयारी

नवी मुंबई ः येणाऱ्या राम नवमी उत्सवानिमित्त नवी मुंबई क्षेत्रातील ऐतिहासीक बेलापूर गांव गुढीपाडव्यापासून सजले-धजले आहे. या गावातील उत्सवाची लगबग सुरु झाली आहे. किर्तन, काकड आरती, हरिपाठ आदिंनी बेलापूर
गाव दुमदूमू लागले आहे. येत्या ३० मार्च रोजी संपन्न होणाऱ्या राम जन्मोत्सवानिमित्त बेलापूरचे ग्रामस्थ जयत्त तयारीस लागले आहेत. ठाणे-बेलापूर पट्टीतील बेलापूर गांव खास करुन ओळखले जात ते येथे साजऱ्या होणाऱ्या राम-मारुती जन्मोत्सवाच्या यात्रेमुळे. श्रीराम जन्मोत्सवाची परंपरा या गावाने १६१ वर्षापासून आजतागायत जपली आहे. ३० मार्च रोजी बेलापूर येथील ‘श्री राम-मारुती जन्मोत्सव मंडळ'च्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता संपूर्ण बेलापूर पंचक्रोशी यात्रा आणि जत्रेच्या निमित्ताने गजबजली आहे. दरम्यान, बेलापूरसह तुर्भे आणि घणसोली येथेही रामनवमी उत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जात आहे.

या श्रीराम-मारुती जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात गुढीपाढव्यापासूनच सुरु झाली असून दररोज बेलापूरकर राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. राजेंद्र बुवा पांडुरंग मांडेवाल यांच्या श्रुशाव्य किर्तनात न्हावून निघत आहेत. राम जन्मोत्सवाच्या दिवशी बेलापूर पंचक्रोशीतील भजनी मंडळाचे संगीत भजनाचे कार्यक्रम संपन्न होणार होणार आहेत. राम जन्म सोहळ्यानंतर छाया-कला सर्कल (दिवाळे कोळीवाडा) यांचे सुस्वर ब्रास बॅण्ड वादन देखील संपन्न होणार आहे. त्यानंतर बेलापूर पंचक्रोशीतील दारावे, करावे, बेलापूर, शहाबाज येथील ९ भजनी मंडळे आपली सेवा श्री राम चरणी अर्पण करणार आहेत. दरम्यान, राम जन्मोत्सवाच्या दिवशी बेलापूरमध्ये जंगी कुस्त्यांचे फड भरविले जातात. यामध्ये सर्वश्रेष्ठ मल्लास संस्थेतर्फे ढाल तसेच बेलापूर केसरी आणि ११  हजार १११ रुपये असा किताब बहाल करण्यात येणार आहे. तसेच इतर कुस्त्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसेही दिली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर-पाटील यांनी दिली. नवी मुंबईसह ठाणे आणि मुंबई येथील भक्तगण बेलापूर येथील राम जन्मोत्सव उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. राम नवमीच्या उत्सवानिमित्ताने बेलापूर गावात लाखोंच्या संख्येने भक्तगण राम मंदिराला भेट देतात, असे चंद्रकांत ठाकूर यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

क्षयरोग संपविण्याचा नवी मुंबईत निर्धार