‘स्वराज्य संघटना' २०२४ मधील निवडणुका लढविणार ! छत्रपती संभाजीराजे यांची घोषणा

 ‘स्वराज्य संघटना' २०२४ मधील निवडणुका लढविणार !

नवी मुंबई ः स्वराज्य संघटना देखील आता राजकीय पक्ष म्हणून मैदानात उतरत असून स्वराज्य संघटना २०२४ मधील सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी कोपरखैरणे येथे केली.
छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी स्थापन केलेल्या ‘स्वराज्य संघटना'ची पहिली जाहीर सभा २६ मार्च रोजी कोपरखैरणे, सेवटर-१५ ते १८ मधील कै. शिवाजीराव पाटील मैदान येथे पार पडली. यावेळी बाईक रॅलीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्यात आल्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली.  

यावेळी संभाजीराजे यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर टिका करताना, सर्व आमदार-खासदार यांनी नितीमत्ता गुंडाळून टाकल्यामुळे या राजकारणाला लोक कंटाळल्याचे सांगितले. त्यामुळे येत्या २०२४ ला स्वराज्य संघटना राजकारणात येणार असल्याचे संभाजीराजे यांनी जाहिर केले. स्वराज्य म्हणजे लोकांचे राज्य असून २०२४ मध्ये तुमच्या हातात आहे. तुम्ही ताकद दिल्यास २०२४ मध्ये बदल दिसेल. तुम्हाला आताचे पुढारी पाहिजेत की सुसंस्कृत पुढारी पाहिजे?  ते तुम्हाला निवडायचे आहे, असे आवाहन देखील संभाजीराजे यांनी यावेळी उपस्थित लोकांना केले.  

छत्रपती संभाजीराजे यांनी गणेश नाईक यांच्यावर टिका करताना अमेरिकेत एकच व्हाईट हाऊस आहे तर दुसरे व्हाईट हाऊस इथे आणायची गरज नाही. फक्त इमारतीला पांढरा रंग लावला म्हणून व्हाईट हाऊस होत नाही. लोकांनी ते ठरवणे महत्वाच असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईत सर्व राज्याचे भवन आहेत. मात्र, शेतकऱ्यासाठी शेतकरी भवन का नाही, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच नवी मुंबई होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामध्ये नवी मुंबईतील जास्तीत जास्त कामगार लागले पाहिजेत, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.  

माहीम मधील वास्तू पाडली त्यासह अफझल खानची कबर काढली, याचे संभाजीराजेंनी कौतुक केले. मात्र, ज्या किल्ल्यांनी संरक्षण दिले त्या विशालगडाची दुरावस्था झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच तेथील अतिक्रमण तत्काळ काढण्याची सूचना केली. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका करत सरकारने अशा मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, असेही नमूद केले.  

सभेच्या सुरुवातीलाच छत्रपती संभाजीराजे यांनी ‘स्वराज्य संघटना'ची नवी मुंबई कार्यकारिणी जाहिर केली. तसेच ‘स्वराज्य संघटना'चे ऐरोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून अंकुश कदम यांच्या नावाची घोषणा करुन संभाजीराजेंनी त्यांच्या प्रचारासाठी आपण स्वतः येणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते ‘स्वराज्य संघटना'चे नवी मुंबई अध्यक्ष उमेश जुनघरे, उपाध्यक्ष ॲड. सचिन शिंदे, उपाध्यक्ष सागर पावगे आणि इतर सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सदर ठिकाणी आगामी प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा नक्कीच ऱ्हास हाेण्याची भीती व्यवत