‘आपला कट्टा'तर्फे नामांकितांच्या मातोश्रींचा सन्मान

जिजा माऊली गे तुला वंदना ही..‘आपला कट्टा' चा ऐरोलीत कार्यक्रम

 नवी मुंबई ः  श्री शिवराज्याभिषेक शकाचे साडेतीनशे वर्षाच्या आगमनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊंना जिजा माऊली गे तुला वंदना ही अशा शब्दात वंदन करून आपला कट्टा संस्था आयोजित आपला कट्टा संस्था आयोजित विशेष कार्यक्रम २६ मार्च रोजी श्री सिद्धिविनायक मंदिर सभागृह, सेक्टर-५, ऐरोली येथे पार पडला.

विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या मातोश्रींचा सन्मान यावेळी जिजाऊ पुरस्कार देऊन करण्यात आला. यावर्षीसाठीचा सामाजिक क्षेत्राचा पुरस्कार विजय जाधव यांच्या मातोश्री श्रीमती ताराबाई जाधव यांना प्रदान करण्यात आला. कलाक्षेत्राचा पुरस्कार प्रसिद्ध छायाचित्रकार पुष्पांक गावडे यांच्या मातोश्री श्रीमती नीता गावडे यांना देण्यात आला.  क्रीडा क्षेत्राचा पुरस्कार अंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू शीतल भोर यांच्या मातोश्री सौ. अलका भोर यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी या मान्यवरांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्रदान सोहळा प्रसंगी अ. भा.मराठी नाट्य परिषद, ऐरोली शाखा अध्यक्ष विजय चौगुले, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती चे अध्यक्ष  सुनील पवार, समाजसेवक रविंद्र औटी, आपला कट्टा संस्था प्रमुख सल्लागार डॉ. अरुण औटी, उपाध्यक्ष पंकज भोसले, अध्यक्षा सौ. ममता भोसले, उपसचिव सिद्धेश गुरव, महेश परब, अमर गायकवाड, श्रीधर झरेकर, शैलेश म्हात्रे व आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित होते.

मराठमोळा साज लेवून मराठी भाषेचा गोडवा गात सौ. शाम्भवी गुरव व सौ. दिपाली वारंग यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. माझे आरोग्य या सत्रात आपत्कालीन वैद्यकीय  परिस्थितीमध्ये तातडीचे उपचार म्हणून उपयुक्त असलेल्या कार्डियो पल्मनरी रेसॅसिटेशन सीपीआर तंत्राचे प्रशिक्षण कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलद्वारे देण्यात आले. मी आणि माझी कला या सत्रात महिलांनी मोठ्या संख्येत सहभाग घेऊन विविध कलाविष्कार सादर केले. पोवाडा, गोंधळ, पारंपरिक लोकगीत यांचेही  सादरीकरण करण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिघा स्थानकाचे उर्वरित काम तत्परतेने पूर्ण करण्याचा निर्णय