एलईडी दिव्यांनी उजळला सायन-पनवेल महामार्ग

नवी मुंबईत सायन-पनवेल महामार्गाला झळाली

तुर्भे ः नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतून जाणारा सायन-पनवेल महामार्ग एलईडीच्या दिव्यांनी उजळला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवी मुंबई महापालिकेकडे सेवा हस्तांतरीत झाल्यानंतर महापालिकेने त्वरित अनेक ठिकाणी बंद पडलेल्या दिव्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. ८ कोटी ५० लाख रुपये खर्चाचे सदर काम आहे, अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.

दरम्यान, सायन-पनवेल महामार्गाला झळाळी मिळाल्यामुळे अंधारामुळे होणारे अपघातांचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे वाहन चालक आणि पादचारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सायन-पनवेल महामार्गावरील दिवाबत्तीची सेवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असताना अनेकदा दिवाबत्ती बंद पडल्याने वाहन चालक आणि रस्ता ओलांडणारे पादचारी यांना नाहक त्रास होत होता. इतकेच नव्हे तर लांबून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने पादचाऱ्यांचे गंभीर तसेच प्राणांतिक अपघात झाले आहे. याविषयी पोलिसांनीही चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने नवी मुंबई महापालिकेकडे सदर सेवा हस्तांतरीत केली. त्याचबरोबर दिवाबत्ती दुरुस्तीसाठी ९ कोटी रुपये दिले होते.

त्यानुसार महापालिकेने निविदा काढून सुमारे १ हजार ३०० दिवाबत्ती (केवळ फिटींग) बदलणे, ३० हायमास्ट लावणे, ४ जीपीआरएस पिलर बसवणे आणि ५ वर्ष देखभाल करणे असे काम ८.५० कोटी रुपयांना दिले आहे. विशेष म्हणजे रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत दिवे आटोमॅटिक डिम होणार असल्याने ३० टक्के विजेची बचत होणार आहे. पूर्वी सोडियम व्हेपरचे ४०० वॅटचे ४ दिवे एका खांबावर होते. आता त्यापेक्षा अधिक प्रकाश देणारे २५० वॅटचे ४ एलईडीचे दिवे लावण्यात आले आहे. सोडियम व्हेपरपेक्षा एलईडीच्या दिव्यांना अल्प वीज लागते. यामुळे विजेच्या देयकात प्रतिमास सुमारे ९ लाख रुपयांची बचत होणार आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ओएनजीसी प्लांट व उरण पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन उरण यांच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न