अनधिकृत फेरीवाल्यांना राजकारण्यांसह महापालिका-एपीएमसीचे अभय ?

एपीएमसी परिसराला फेरीवाल्यांचा विळखा

तुर्भे ः आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आलेल्या तुर्भे येथील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) येथील मार्केट परिसराला चारही बाजुंनी बेकायदेशीर फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. एपीएमसी प्रशासन आणि महापालिका यांच्याकडून या फेरीवाल्यांना अभय मिळत असल्याने त्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

एपीएमसी परिसर महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयाच्या क्षेत्रात येतो. या कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, अतिक्रमण हटवण्यासाठीच्या गाडीवरील कामगार, बोर्डाचे सुरक्षा रक्षक, एपीएमसी मार्केटचे सुरक्षा रक्षक, काही कर्मचारी, स्थानिक राजकारणी यांना प्रत्येक महिन्याला सदर फेरीवाले ठराविक रक्कम (हप्ता) देत आहेत. तसेच हप्त्याची रक्कम वर पर्यंत पोहोचत असल्यामुळेच सदर फेरीवाले बिनदिवकतपणे पादचाऱ्यांसाठीच्या पदपथावर ठाण मांडून बसले आहेत, अशी चर्चा एपीएमसीतील व्यापारी आणि अन्य घटक यांच्यामध्ये आहे.

तुर्भे विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी म्हणून भरत धांडे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर त्यांनी फेरीवाल्यांविरोधात जोरदार कारवाई सुरु केली होती. परिणामी, एपीएमसी फळ मार्केट ते भाजी मार्केट या मार्गावरील पदपथ पादचाऱ्यांना चालण्यासाठी उपलब्ध झाला होता. त्यामुळे पादचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, स्वार्थासाठी काही राजकीय पक्षांनी या कारवाईला विरोध चालू केला होता. तेव्हा पासून एपीएमसी परिसरातील फेरीवाला हटाव मोहिमेला खीळ बसली आहे.

नव्याचे नऊ दिवस या उवतीप्रमाणे सध्या तुर्भे विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाचा कारवाईचा जोर ओसरला आहे. त्यामुळे सिटी मॉल ते एपीएमसी सिग्नल, एपीएमसी सिग्नल ते भाजीपाला मार्केट जावक गेट, याच जावक गेटच्या विरुध्द बाजुचा सर्व्हिस रोड, माथाडी भवन ते जलाराम मार्केट चौक, सानपाडा हायवे सिग्नल ते एपीएमसी सिग्नल, सानपाडा रेल्वे स्टेशन या ठिकाणी फेरीवाल्यांनी पदपथावर बस्तान मांडले आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केट मध्ये येणारे कामगार, खरेदीदार आदि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे. परिणामी, अनेकदा किरकोळ आणि गंभीर स्वरुपाचे अपघात होत असल्याची नोंद वाहतूक पोलीस शाखेकडे आहे.

एपीएमसी वाहतूक पोलीस शाखेच्या पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनीही वाहतुकीला अडथळा ठरलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना अनेकदा कळवले आहे. मात्र, महापालिका तक्रार आली की थातुरमातुर कारवाई करते. त्यानंतर फेरीवाले पुन्हा पदपथ बाळकावून या कारवाईला ‘हप्ता'च्या जोरावर ठेंगा दाखवतात. त्यामुळे आता महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनीच या प्रकरणी लक्ष घालून फेरीवाले, महापालिका कर्मचारी, राजकारणी, बोर्डाचे सुरक्षा रक्षक यांचे रॅकेट उध्वस्त करुन पादचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एलईडी दिव्यांनी उजळला सायन-पनवेल महामार्ग