जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली ‘जेल भरो' आंदोलन

राहुल गांधींच्या शिक्षेच्या निषेधार्थ नवी मुंबई काँग्रेस रस्त्यावर !

नवी मुंबई ः ‘काँग्रेस'चे खासदार राहुल गांधी यांना गुजरात मधील सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्याचा निषेधार्थ ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'चे अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली ‘काँग्रेस'च्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. यावेळी ‘काँग्रेस'च्या पदाधिकाऱ्यांनी, माजी नगरसेवकांनी, विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजप सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला. तसेच ‘काँग्रेस'च्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ‘जेल भरो' आंदोलन करुन आपला निषेध व्यक्त केला. खा. राहुल गांधी यांना शिक्षा झाल्याच्या निषेधार्थ देशात सर्वत्र ‘काँग्रेस'च्या कार्यकर्त्यांकडून २३ मार्च रोजी निदर्शने आणि आंदोलने करण्यात आली. नवी मुंबईतही सुरत न्यायालयाच्या निर्णयाचे पडसाद तात्काळ उमटले. ‘काँग्रेस'चे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली ‘काँग्रेस'चे पदाधिकारी-रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी वाशी पोलीस ठाणेच्या आवारात ठिय्या मांडत आपले आंदोलन सुरु केले. केंद्र सरकार सुडबुध्दीने वागत असल्याचे सांगत ‘काँग्रेस'च्या नेत्यांनी भाषणातून आपला संताप यावेळी व्यक्त केला. यावेळी ‘काँग्रेस'च्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.  खासदार राहूल गांधी यांना शिक्षा ठोठावल्याचे वृत्त समजताच ‘काँग्रेस'चे नवी मुंबईतील पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक, नगरसेविका वाशीतील काँग्रेस भवनात जमा झाले. त्यांनी काँग्रेस भवन पासून वाशी पोलीस ठाणे पर्यंत मुक मोर्चा काढला. यानंतर वाशी पोलीस ठाणे येथेच ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बालयोगी श्री सदानंद महाराज यांची प्रमुख उपस्थितीत हनुमान मंदिराचा जिर्णोध्दार, प्राणप्रतिष्ठा