नवी मुंबईतील वास्तुविशारद हितेन सेठी व कलाकार एम.पी.पवार यांचा समितीत समावेश  

कोकणातील शहरांमध्ये स्वच्छता व सौंदर्यीकरणाबाबत स्पर्धा

नवी मुंबई : राज्य सरकारच्या नगरविकास विभागामार्फत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात आलेल्या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा -२०२२ मध्ये सहभागी झालेल्या कोकण विभागातील शहरांपैकी पहिल्या तीन क्रमांक पटकावणाऱया शहरांची निवड करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. लवकरच ही समिती स्पर्धेचा निकाल शासनाकडे सादर करणार आहे. त्यामुळे कोकणातील सर्वात स्वच्छ व सुंदर शहराचा मान कोणाकडे जातो याची कोकणवासियांना उत्सुकता लागली आहे.  

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्याच्या नगरविकास विभागामार्फत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध शहरांमध्ये शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा -२०२२ चे आयोजन २ ऑटोबर ते ३१ डिसेंबर -२०२२ या कालावधीत केले होते. या ९० दिवसाच्या कालावधीत विविध शहरांनी शहर सौंदर्यीकरण व स्वच्छतेबाबत राबविलेल्या विविध उपक्रमांचे परिक्षण विभागीय आयुक्तांनी नेमलेली समिती करणार आहे.  

या स्पर्धेचे परिक्षण कोकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती करणार असून या समितीत सदस्य म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मान्यता प्राफ्त वास्तुविशारद (आर्किटेक्ट) हितेन सेठी, मान्यताप्राप्त कलाकार एम. पी. पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नगरपरिषद प्रशासनाचे प्रादेशिक उपसंचालक रविंद्र जाधव हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून या समितीत कार्यरत असणार आहेत.  

या समितीने केलेल्या परीक्षणानंतर कोकणातील सर्वात उत्तम सौंदर्यीकरण व स्वच्छ शहराचा बहुमान कोणत्या तीन शहरांना मिळतो आहे याची उत्सुकता कोकण विभागातील नागरिकांना लागली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नव्याने सुधारित प्रारुप विकास आराखडा तयार करण्याची मागणी