महापालिकेच्या ७९ शाळांमध्ये जलबचत विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन

जलबचत सप्ताह उत्साहात साजरा
 

नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत निर्देशित केल्याप्रमाणे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार जलजागृती सप्ताहाचे १६ ते २२ मार्च २०२३ या कालावधीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते.  

यामध्ये आयुक्तांमार्फत महापालिकेच्या सर्व सोशल माध्यमांवरुन नागरिकांना जलबचतीचे आवाहन करण्यात आले. याशिवाय शहरात ठिकठिकाणी जलजागृती सप्ताहाचे होर्डींग प्रसारित करण्यात आले. हस्तपत्रके वितरित करण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या एलईडी स्क्रीन्सवर जलबचतीचा संदेश प्रसिध्द करण्यात आला. अशा विविध प्रकारे संदेश प्रसारित करण्यासोबतच पाण्याचे महत्व विदयार्थ्यांना लहान वयापासूनच कळावे याकरिता नवी मुंबई महापालिकेच्या सर्व ७९ शाळांमध्ये जलबचत विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

महापालिकेच्या ५६ प्राथमिक आणि २३ माध्यमिक शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांनी आकर्षक हस्तफलक तयार करुन त्यावर जलबचतीचे संदेश रेखाटले. काही शाळांमध्ये पाण्याचे महत्व पटवून देणाऱ्या विषयांवर चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांवर जलबचतीचे संस्कार करण्यासोबतच पालकसभा घ्ोऊन पाणी बचतीचा संदेश यावेळी प्रसारित करण्यात आला.

अनेक शाळांनी आपापल्या परिसरात जलजागृती करणाऱ्या प्रभातफेऱ्या काढून ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा' अशा विविध प्रकारच्या घोषणा देत जनसामान्यांना पाण्याचे महत्व पटवून दिले. काही शाळांमध्ये पाणी बचतीवर भाषणे तर दोन शाळांमध्ये पारंपारिक किर्तनेही सादर झाली. काही शाळांनी आपल्या परिसरातील मुख्य रस्त्यांवर तसेच मुख्य चौकांमध्ये जलजागृतीपर पथनाटये सादर केली.

सर्वच्या सर्व ७९ शाळांमधील वर्गावर्गामध्ये पाणीबचतीची सामुहिक जलप्रतिज्ञा घ्ोण्यात आली. प्रतिज्ञेनंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व सांगत पाण्याचा उपव्यय टाळणे, पाणी बचत याविषयी सविस्तर माहिती दिली. नवी मुंबई महापालिका शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, शाळेतील कर्मचारी, सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी तसेच ३५ हजारहून अधिक मुलांनी एकत्र येत जलबचतीचे महत्व अधोरेखित करीत जलबचत सप्ताह उत्साहात साजरा केला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईतील वास्तुविशारद हितेन सेठी व कलाकार एम.पी.पवार यांचा समितीत समावेश