पाडव्यातील आनंदाच्या शिधाचा गोडवा कधी मिळणार रेशन कार्ड धारकांकडून सवाल पस्थित

पाडव्यातील आनंदाच्या शिधाचा गोडवा कधी मिळणार ?

वाशी ः दिवाळी प्रमाणे यंदा सर्वसामान्यांचा पाडवा देखील गोड जावा म्हणून गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रेशन दुकानात १०० रुपयांत चार वस्तूंचा शिधा जिन्नस देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. मात्र, जुनी पेन्शन आंदोलनात शासकीय कर्मचारी सहभागी झाल्याने  धान्य वितरण व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती. सदर संप २० मार्च रोजी मिटला असला तरी रेशन दुकानात अजूनपर्यंत पूर्ण शिधा जिन्नस पोहचला नसल्याने आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला नाही. त्यामुळे पाडव्यातील आनंदाच्या शिधाचा गोडवा कधी मिळणार ?,  असा सवाल रेशन कार्ड धारकांकडून उपस्थित केला जात आहे.

गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रेशन दुकानात १०० रुपयांत चार वस्तूंचा शिधा जिन्नस देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. यात सणानिमित्त आवश्यक रवा, साखर, चणाडाळ आणि पामतेल या चार महत्त्वाच्या वस्तूंचा प्रत्येकी एक किलो जिन्नस अवघ्या १०० रुपयांमध्ये रेशनवर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, शिधावाटप कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्याने धान्य वितरण प्रणाली ठप्प झाली होती. २० मार्च रोजी संप मागे घ्ोण्यात आला आहे. मात्र, वितरकांकडून धान्य दुकानांमध्ये अजून पर्यंत पूर्ण क्षमतेने या जिन्नस पोहोचल्या नाहीत. नवी मुंबई मधील १०४  रेशन दुकानातून स्वस्त धान्य वितरण केले जाते. तर आनंदाच्या शिधासाठी ४८ हजार रेशन कार्ड धारक पात्र आहेत. मात्र, बहुतेक रेशन दुकानात यातील अर्ध्या वस्तू अजून पर्यंत पोहचल्या नाहीत. त्यामुळे पाडवा सरला तरी आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला नाही. परिणामी पाडव्यातील आनंदाच्या शिधाचा गोडवा कधी मिळणार?, असा प्रश्न रेशन कार्ड धारक उपस्थित करीत आहेत.

आनंदाचा शिधा मध्ये चार वस्तूंचा संच आहे. मात्र, यातील अर्धा जिन्नस अजून पर्यंत रेशन दुकानात दाखल झाला नसून, येत्या एक-दोन दिवसात आनंदाचा शिधा मधील वस्तू दाखल झाल्यानंतर आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे. - छाया पालवे, शिधावाटप अधिकारी - ४१ (उप) वाशी.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरुळ येथील भूखंडाला ६.७२ लाखाचा विक्रमी दर