‘पलाईंग राणी' नमुंमपा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची विजेती

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका तर्फे आयोजित ‘नमुंमपा करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा'मध्ये कलामंथन, ठाणे यांच्या ‘पलाईंग राणी' या एकांकिकेने सर्वोत्तम सादरीकरण करीत ५० हजार रक्कमेचे पारितोषिक तसेच प्रशस्तिपत्रासह पटकाविला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून सादर झालेल्या एकांकिकांमधून सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा ११ हजार रक्कमेसह प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्हासह विशेष पुरस्कार ऐरोली येथील शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान यांच्या ‘आय एम पुंगळ्या शारूक्या आगीमहूळ' या
एकांकिकेस प्राप्त झाला.या विजेत्यांना आमदार गणेश नाईक यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, वाशीचे सहा. आयुक्त दत्तात्रय घनवट, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव तसेच महाअंतिम फेरीचे परीक्षक ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक कुमार सोहोनी, विजय केंकरे, अभिनेत्री ईला भाटे त्याचप्रमाणे प्राथमिक फेरीचे परीक्षक अभिनेते शेखर फडके, रवी वाडकर, वैभव सातपुते, आदि उपस्थित होते.

प्राथमिक फेरीत सहभागी ४० एकांकिकांतून महाअंतिम फेरीसाठी १५ एकांकिकांची निवड करण्यात आली. त्यामधून दोन दिवस चाललेल्या महाअंतिम फेरीतील १५
एकांकिकांमधून कलामंथन, ठाणे यांच्या ‘पलाईंग राणी' यांनी बाजी मारत नमुंमपा राज्यस्तरीय करंडक पटकाविला. माय नाटक कंपनीची ‘गोदा' एकांकिका द्वितीय तसेच सिध्दरुढ, ठाणे यांची ‘डिट्टो रखुमाई' एकांकिका तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी शिवाजी विद्यापीठ यांची ‘विषाद' तसेच स्वभाव कल्याण यांची ‘क्ष्फॅमजॅम' या एकांकिका उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानित झाल्या.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्वोत्तम एकांकिकेचे विशेष पारितोषिक शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान, ऐरोली यांच्या ‘आय एम पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ' या एकांकिकेने पटकाविले. या एकांकिकेचे दिग्दर्शक प्रशांत निगडे यांची एकांकिका यावर्षीच्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली असून नवी मुंबईचा नावलौकिक राज्यभरात कलाप्रांतात वाढविणाऱ्या या रंगकर्मीचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. याशिवाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट लेखक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना, सर्वोत्कृष्ट नेपथ्य, सर्वोत्कृष्ट रंगभूषा व वेशभूषा अशी वैयक्तिक पारितोषिकेही रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रे स्वरुपात
प्रदान करण्यात आली. प्राथमिक फेरीतील उत्तम अभिनयाची प्रशस्तिपत्रेही यावेळी वितरित करण्यात आली. त्याचप्रमाणे स्पर्धेत सहभागी सर्व ४० एकांकिका समुहांना प्रशस्तिपत्रांसह सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

दरम्यान, नवी मुंबईसह ठाणे जिल्हा, रायगड, पालघर, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर, जळगाव, अमरावती अशा महाराष्ट्र राज्यातील विविध भागांतून या एकांकिका स्पर्धेस उत्साही सहभाग लाभल्याने कलावंतांनी एकच जल्लोष केला होता. महापालिकेच्या सांस्कृतिक कार्य-क्रीडा विभागाने केलेल्या नेटक्या आयोजनाचे मान्यवर परीक्षकांसह राज्यभरातून आलेल्या एकांकिका समुहांनी कौतुक केले.

ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक कुमार सोहोनी, विजय केंकरे यांना मानपत्र प्रदान...
नमुंमपा करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे परीक्षण करणारे ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक कुमार सोहोनी यांना नुकताच कलाक्षेत्रातील सर्वोच्च  मानाचा संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय कलापुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुमर् यांच्या शुभहस्ते प्राप्त झाला असल्याने त्यांचा आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते नाट्य, चित्रपट क्षेत्रातील सुवर्णमहोत्सवी कारकिर्दीचा गौरव करणारे मानपत्र प्रदान करुन विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रयोगशील नाट्यदिग्दर्शक म्हणून ख्याती असणारे आणि नाटक एके नाटक असा ध्यास घेऊन नाट्यक्षेत्रामध्ये ४० हून अधिक वर्षे अथक कार्यरत असणारे ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांची शंभरावी नाट्य दिग्दर्शकीय कलाकृती काळी राणी रंगमचावर अविष्कृत झाली आहे. या नाट्यसेंच्युरीच्या आगळ्यावेगळ्या विक्रमाबद्दल त्यांनाही मानपत्र प्रदान करुन समस्त नवी मुंबईकर रसिकांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिका आयुवतांकडून नागरी सेवासुविधांचा आढावा