कर थकबाकीदारांसमोर ढोल वाजवा मोहीम

सानपाडा फुल स्टॉप मॉल मधील ८ थकबाकीदारांवर कारवाई; युनिट सील


वाशी: नवी मुंबई महापालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार आवाहन तसेच अभय योजना सुरु करून देखील काही मालमत्ताधारक कर भरण्यास दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अशा बड्या मालमत्ता थकबाकीदारांच्या समोर ढोल वाजवून त्यांना मालमत्ता कर भरण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. त्याची सुरुवात २० मार्च पासून करण्यात आली आहे.

महापालिकेची सानपाडा येथील फुल स्टॉप मॉलमधून २०-२१ कोटींची मालमत्ता कर थकबाकी असून त्यासाठी महापालिकेकडून १५ जणांवर कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, त्यापैकी काहींनी ५० लाख रुपये  भरल्याने त्यांच्यावर तुर्तास कारवाई करण्यात आली नाही. परंतु, ८ थकबाकीदारांवर कारवाई करुन त्यांचे युनिट सील करण्यात आले आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर सर्वात मोठा स्त्रोत आहे. मात्र, नवी मुंबई शहरात आजही मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची थकबाकी आहे. कोरोना काळात मालमत्ता कराची थकबाकी अधिक झाली होती. त्यामुळे कोरोनाच्या कालावधीत नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने मालमत्ता कर थकबाकीदारांकरिता अभय योजना लागू करण्यात आली होती. मात्र, अभय योजना लागू करून देखील काही थकबाकीदारांनी कर भरण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे अशा मोठ्या रक्कमेची थकबाकी असणाऱ्यांवार महाप्पालिकेने कर वसुलीसाठी लक्ष केंद्रित केले असून त्यांना नोटिस बजावल्या आहेत.

दुसरीकडे नोटीस बजावून देखील काही थकबाकीदारांकडून कराची रवकम भरण्यास दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे अशा थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी महापालिकेने नामी शक्कल लढवली आहे. थकबाकीदारांसमोर ढोल वाजवून त्यांना मालमत्ता कर भरण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. या अनोख्या उपक्रमाची सुरुवात २० मार्च पासून करण्यात आली. त्यानुसार सानपाडा-पामबीच सेवटर-१९ येथील फुल स्टॉप मॉल मधील १५ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी आठ युनिट सील करण्यात आली आहेत. या आठ जणांकडे ६ कोटी ६६ लाख रुपयांची कर थकबाकी आहे. तर या मॉलमधील युनिटकडून जवळपास २०-२१ कोटींची थकबाकी आहे.

शहरातील बडे मालमत्ता कर थकबाकीदार यांच्याकडून कर वसुलीसाठी त्यांच्यासमोर ढोल बजाव मोहीम राबवून वसुली करण्यात येत आहे. सानपाडा येथील फुल स्टॉप मॉलपासून सुरुवात करण्यात आली आहे. त्याठिकाणाहुन २०-२१ कोटी रुपयांची थकबाकी येणे आहे. त्यापैकी ४-५ जणांनी ५० लाखाची थकबाकी भरल्याने तुर्तास त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. परंतु, ८ थकबाकीदारांवर कारवाई करुन त्यांचे युनीट सील करण्यात आले आहेत.

-दत्तात्रय काळे, वसुली अधिकारी-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘पलाईंग राणी' नमुंमपा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची विजेती