महापालिकेतील १६३ पीएपी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेत कायम करण्याची मागणी

‘एनएमएमटी'मधील कर्मचाऱ्यांचे ‘बेलापूर'च्या आमदारांना साकडे

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमात अभियांत्रिकी विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या ‘श्रमिक सेना'च्या शेकडो कर्मचाऱ्यांनी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घ्ोतली. सदर कर्मचारी ‘एनएमएमटी'मध्ये गेल्या १२ वर्षापासून परिवहन सेवेमध्ये कार्यरत असून त्यांची नियुक्ती विहीत मार्गाने, नियमानुसार तसेच जाहिरात काढून मुलाखती घ्ोऊन करण्यात आली आहे. असे असताना देखील परिवहन उपक्रमामध्ये कायमस्वरुपी केले जात नसल्याची खंत यावेळी या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच त्याअनुषंगाने निवेदनही दिले.

दरम्यान, ज्याप्रमाणे नवी मुंबईतील १६३ प्रकल्पग्रस्त कर्मचारी यांना कायमस्वरुपी करण्यात आले, त्याचप्रमाणे ‘एनएमएमटी'तील सदर कर्मचाऱ्यांनाही सेवेत कायम करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिले. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमामध्ये अभियांत्रिकी विभागात सदर कर्मचारी गेल्या १२ वर्षापासून सेवा देत आहेत. यामध्ये मॅकेनिकल ३६ आणि मदतनीस ५४ असे कर्मचारी कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यांची झालेली नियुक्ती विहीत मार्गाने आणि मुलाखती द्वारे करण्यात आलेली आहे. ते श्रमिक सेना संघटना युनियन मध्ये काम करीत असून गेली अनेक वर्षे न्याय मिळाला नसल्याने आज त्यांनी माझी प्रत्यक्ष भेट घ्ोतली. सदर कर्मचाऱ्यांची मागणी रास्त असून गेली अनेक वर्षे मागणी तसेच पाठपुरावा करुनही त्यांना न्याय मिळत नसल्याची बाब अत्यंत खेदाची आहे, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरुळ-उरण रेल्वे मार्गाचे लवकरच लोकार्पण