खारघर मध्ये उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचे स्थलांतर

‘सिडको' 'ला उपलब्ध होणार मोठ्या क्षेत्रफळाची जागा

खारघर ः ‘महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी'कडून खारघर मधून जाणारी उच्च दाबाची विद्युत वाहिनी स्थलांतरीत करण्यात येत असल्यामुळे ‘सिडको'च्या गोल्फ कोर्स आणि  खारघर कार्पोरट पार्क प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होणार आहे. मात्र, या कामासाठी ‘सिडको'ला कोट्यावधी रुपये खर्च करावे लागल्याचे समजले.

खारघर मधील गोल्फ कोर्स, सेन्ट्रल पार्क तसेच ‘सिडको'कडून होऊ घातलेल्या खारघर कॉर्पोरेट पार्क प्रकल्पाकडून तळोजा मध्यवर्ती कारागृहाकडे जाणाऱ्या उच्च दाबाच्या (हाय टेंशन) विद्युत वाहिनीखालील जागेवर कोणतेही बांधकाम करता येत नाही. विद्युत वाहिनी खालील जागा काही ठिकाणी नर्सरीसाठी देण्यात आली आहे.

गोल्फ कोर्स मध्ये दोन ठिकाणी उच्च दाबाचे टॉवर आणि विद्युत वाहिनी जात असल्यामुळे गोल्फ खेळण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे तसेच खारघर कार्पोरटसाठी राखीव असलेली जागा आहे. मात्र, भविष्यात उच्च दाबाच्या वाहिन्यांमुळे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होवू नये म्हणून ‘सिडको'तर्फे ‘महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी'च्या सहकार्याने गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क आणि कार्पोरेट पार्क साठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेवरील उच्च दाबाची विद्युत वाहिनी आणि टॉवर स्थलांतर करण्याचे काम हाती घ्ोण्यात आले आहे.

जवळपास तीन किलोमीटर अंतरावर नव्याने उच्च दाबाच्या वाहिनीचे सेंट्रल पार्क मार्गे तळोजा कारागृहाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला स्थलांतर करण्यात येणार असून सदर काम जोरात सुरु आहे. त्यामुळे येत्या मे अखेर पर्यंत उच्च दाबाच्या वाहिनीचे काम पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे ‘महापारेषण'च्या अधिकाऱ्यांकडून समजले. याविषयी ‘सिडको'च्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ‘सिडको'च्या विद्युत विभागाकडून माहिती प्राप्त करुन ती उपलब्ध करुन दिली जाईल, असे सांगितले. मात्र, अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
 

सीबीडी, खारघर, खारघर हिल, गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क, खारघर कार्पोरेट पार्क आणि सेक्टर-३५ हाईड पार्क मार्गे जाणाऱ्या उच्च दाबाची विद्युत वाहिनी रोहिंजण ग्रामीण मार्गे कल्याणच्या दिशेने जात आहे. सद्यस्थितीत उच्च विद्युत दाबाची  वाहिनी गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क आणि खारघर कार्पोरेट मार्गे सेक्टर-३५ कडे मोकळ्या जागेतून जात आहे. त्यामुळे सदर उच्च दाबाची वाहिनी स्थलांतरीत करण्यासाठी सेक्टर-४ डोंगर मार्गे सेंट्रल पार्क, गुरुद्वारा आणि टाटा हॉस्पिटल समोरुन जाणाऱ्या रस्त्याचा कडेला जवळपास नव्याने २५ ठिकाणी उच्च दाबाच्या वीज वाहिनीचे टॉवर उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स आणि सेक्टर-३५ हाईड पार्क लगत असलेली मोठी जागा ‘सिडको'ला उपलब्ध होणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वकील संघटनेला साद