कोपरखैरणे येथे ‘स्त्री मुवती संघटना'तर्फे कचरावेचक भगिनी संवाद सभा संपन्न

नवी मुंबई स्वच्छ करण्याचे श्रेय कचरावेचक भगिनींना -आयुक्त राजेश नार्वेकर

नवी मुंबई ः  ज्या ठिकाणी कचरा गाडी जाण्याची यंत्रणा नाही तिथे जाऊन कचरा वेचक महिला प्रामाणिकपणे काम करतात, ते मी माझ्या स्वच्छता पाहणी दौऱ्यात पाहिले आहे. त्यामुळे नवी मुंबई स्वच्छ करण्याचे श्रेय कचरावेचक भगिनींना जाते, असे गौरवोद्‌गार महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांनी काढले.

‘स्त्री मुवती संघटना'तर्फे कोपरखैरणे येथे आयोजित कचरावेचक भगिनी संवाद सभेत आयुक्त राजेश नार्वेकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजाळे, अतिरिक्त शहर अभियंता तथा क्षेपणभूमी व्यवस्थापन प्रमुख शिरीष आरदवाड, महापालिका जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, श्रीराम मेमोरियल ट्रस्टचे राधाकृष्णन, गॅलेक्सी सरफॅक्टंटचे उपाध्यक्ष आदर्श नय्यर, ‘अन्वय प्रतिष्ठान'चे संचालक डॉ. अजित मगदूम, ‘स्त्री मुवती संघटना'च्या अध्यक्षा ज्योती म्हापसेकर, प्रा. वृषाली मगदूम, आदि उपस्थित होते.

सध्या ज्या पाच ठिकाणी स्लम मॉडेल म्हणून काम सुरु आहे. त्यामध्ये वाढ करुन अजून चार ठिकाणी कचरा व्यवस्थापनाचे काम सुरु करण्यात येणार आहे. तसेच  कचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करुन सध्या दोन ठिकाणी ट्रान्सफर सेंटर उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे. सेंटर उभारल्यास महिलांना सुका कचरा चांगला मिळेल त्यातूनच नवी मुंबई स्वच्छ आणि कचरा मुक्त होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे आयुवत राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

कचरा वेचक भगिनीचा मुलगा आयएएसचे प्रशिक्षण घेत आहे, याचा उल्लेख करुन पाच वर्षांनी तो माझ्या ठिकाणी उभा असेल. ती माझ्यासाठी अत्यंत समाधानाची बाब असेल. नवी मुंबई स्वच्छ करणे एवढे मर्यादित हेतू नसून यातून या महिलांच्या व्यथा दूर करुन त्यांचे उत्पन्न कसे वाढेल, असेही आयुवत नार्वेकर यांनी सांगितले.

यावेळी  प्रा. वृषाली मगदूम यांनी आपल्या प्रास्ताविकातून कचरा वेचक महिलांना महापालिका प्रशासन आणि इतर संस्थांच्या माध्यमातून जी मदत झाली आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत कचऱ्यात काम करत असताना महिलांना येणाऱ्या समस्यांचा उहापोह केला. ‘स्त्री मुवती संघटना'च्या अध्यक्ष ज्योती म्हापसेकर यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कचरावेचकांना मिळणाऱ्या सुविधांचा उल्लेख करुन त्या धर्तीवर सुरू असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या कामाबद्दल प्रशंसोद्‌गार काढले.

राधाकृष्णन यांनी आज कचरा वेचत असणाऱ्या भगिनींची पुढील पिढी याच कामात येऊ नयेत या उद्देशाने त्यांच्या मुला- मुलींच्या शिक्षणासाठी योगदान त्यांच्या ट्रस्टतर्फे केले जात असल्याचे सांगितले. स्त्री उन्नती आणि ग्यान संजीवनी या प्रकल्पांद्वारे मदत करणारे आदर्श नय्यर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

45 हजार रुपये किमतीचे ई सिगारेट आणि विदेशी सिगारेट जफ्त