शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
एका खाजगी दवाखान्यामार्फत जैविक कचरा रस्त्यावर फेकून देण्यात आल्याचा संशय
तुर्भे गावात रस्त्यावर जैविक कचरा
वाशी ः तुर्भे गावातील रस्त्यावर जैविक कचरा आढळल्याची बाब समोर आली आहे. येथील एका खाजगी दवाखान्यामार्फत सदर जैविक कचरा रस्त्यावर फेकून देण्यात आल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जैविक कचरा फेकणाऱ्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील महापालिका रुग्णालय आणि नोंदणीकृत इतर खासगी रुग्णालयातील जैविक कचरा अर्थात बायोमेडिकल वेस्टची व्हिल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा आहे. खाजगी संस्थेला अशा रुग्णालयातील जैविक कचरा नेऊन त्याची तांत्रिक पध्दतीने विल्हेवाट लावण्याचे काम देण्यात आले आहे. जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणे संबंधित शासकीय, खासगी रुग्णालय आणि संबंधित डॉक्टरांची जबाबदारी आहे. हीच नियमावली खाजगी क्लिनिकना देखील लागू असून प्रशासनाने ठरवून दिलेल्या संस्थेकडे त्यांनी जैविक कचरा देणे आवश्यक आहे.
डॉक्टर अथवा रुग्णालयांनी जैविक कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकला तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. प्रसंगी क्लिनिक अथवा दवाखाना बंदही केला जाऊ शकतो. मात्र, अशी नियमावली असून देखील १४ मार्च रोजी तुर्भे गावातील साईबाबा मंदिर आणि मानस बार शेजारी अज्ञातांकडून रस्त्यावरच जैविक कचरा फेकला गेला आहे. अशा जैविक कचऱ्यास कुणाचा स्पर्श झाल्यास त्याच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. मागील वर्षी देखील तुर्भे गावात कचरा कुंडीत जैविक कचरा फेकला गेला होता. त्यामुळे अशा प्रकारे रस्त्यावर जैविक कचरा फेकून नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आगरी सेना तुर्भे विभाग प्रमुख शरद पाटील यांनी केली आहे.