प्रारुप विकास आराखड्यावर बोगस हरकती

हरकतींबाबत हरकतदारच अनभिज्ञ

वाशी ः नवी मुंबई महापालिकेच्या प्रारुप विकास आराखड्याला अंतिम मंजुरी देण्याच्या अनुषंगाने महापालिका नगररचना विभागामार्फत प्रयत्न सुरु असून याअंतर्गत आवश्यक विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी महापालिकेने जाहिर केलेल्या आणि विहित मुदतीत नागरिकांनी नोंदवलेल्या हरकती-सूचना यावर १४ मार्च पासून सुनावणीस प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र, यातील बहुतांश हरकतदार त्यांनी घेतलेल्या हरकतींबाबत अनभिज्ञ होते तर काही जणांच्या नावे बोगस हरकती नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामुळे सदरच्या हरकती नोंदवल्या कुणी? यामागे काही षडयंत्र आहे का? अशी चर्चा नवी मुंबईत रंगू लागली आहे.

नवी मुंबई महापालिका स्थापन होऊन ३० वर्ष उलटली आहेत. आजवर नवी मुंबई शहराचा विकास आराखडा तया झालेला नाही. २०१७ साली महापालिकेने महासभेत प्रारुप विकास आराखडा सादर केला होता. पण, पक्ष प्रतोदांच्या नजरेखाली घालून शासनाकडे पाठविण्यात आला होता. शासनाने या प्रारुप विकास आराखड्याला मंजुरी दिली. यानंतर अंतिम स्वरुप देण्याकरिता १० ऑगस्ट रोजी प्रारुप विकास आराखडा नागरिकांच्या हरकती-सूचना याकरिता प्रसिध्द करण्यात आला. त्यानुसार नवी मुंबईतील नागरिकांनी प्रारुप विकास आराखड्यावर १५८९२ हरकती-सूचना नोंदविल्या आहेत. याच हरकती-सूचनांवर नियोजन समिती पुढे १४ मार्च पासून सुनावणीला सुरुवात झाली आहे.
मात्र, सदर हरकती-सूचनांबाबत आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्या नागरिकांच्या नावे हरकती-सूचना नोंविण्यात आल्या आहेत, त्या कशासाठी नोंदविण्यात आल्या हेच संबंधित हरकतदारांना माहित नाही.

महापालिकेकडून सुनावणीला उपस्थित राहण्यासंबंधी नोटीस आल्यानंतर सदर प्रकार उघड झाला आहे. काही जणांना महापालिका घरे देणार आहे म्हणून सुनावणीस कागदपत्रे घेऊन हजर रहा, असे सांगण्यात आले होते. काही जणांच्या नावे बोगस हरकती नोंदवल्या गेल्या आहेत. परिणामी, याप्रकरणी काही जणांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे सदरच्या हरकती नोंदवल्या कुणी? यामागे काही षडयंत्र आहे का? अशी चर्चांना आता नवी मुंबईमध्ये उत आला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर मध्ये एकदिवसीय संत समागम संपन्न