नेरुळ रेल्वे स्थानक फेरीवाला मुक्त करण्याची मागणी

नेरूळ रेल्वे स्थानकाला ‘भाजी मंडई'चे स्वरुप

वाशी ः हार्बर मार्गावरील नेरुळ रेल्वे स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा पडला असून रेल्वे स्थानकाला सध्या भाजी मंडईचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या मंडईतून वाट काढताना प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नेरुळ स्थानक फेरीवाला मुक्त करण्याची मागणी होत आहे.

हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर ‘सिडको'च्या माध्यमातून अद्ययावत अशी रेल्वे स्थानके विकसित करण्यात आलेली आहेत. मात्र, या रेल्वे स्थानकांच्या देखभालीकडे ‘सिडको'चे दुर्लक्ष होत असल्याने स्थानकांना बकालपणा येत चालला आहे. अशीच अवस्था नेरुळ स्थानकाची झाली आहे.

सध्या या स्थानकात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले वाढले आहेत. फेरीवाल्यांनी प्रवेशद्वारा पासून ते फलाटापर्यंत जागा अतिक्रमित केल्याने नेरुळ स्थानकाला भाजी मंडईचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मागील महिन्यातच  ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी नेरुळ आणि कोपरखैरणे स्थानकाला भेट देत येथील सेवा-सुविधा सुधारण्यावर भर देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, त्यांच्या या आदेशाला सुरक्षारक्षकांनी केराची  टोपली दाखविली असल्याने नेरुळ रेल्वे स्थानकाला फेरीवाल्यांनी विळखा घातला आहे. परिणामी, प्रवाशांना या रेल्वे स्थानकातून वाट काढताना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे येथील फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

नेरुळ स्थानकात फेरीवाल्यांमुळे सकाळी लोकल पकडताना खूप त्रास होतो. कधी कधी  लोकल सुटून जाते आणि कार्यालयात पोहोचण्यास उशीर होतो. त्यामुळे सिडको प्रशासनाने रेल्वे स्थानक फेरीवाला मुक्त करण्याची गरज आहे. -संगीता डोईफोडे, रहिवासी, नेरुळ. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अवकाळी पावसाचा पांढऱ्या कांद्याच्या पिकाला फटका