आमदार निधीतून ब्रास बॅन्ड प्रशिक्षण केंद्र, व्यायामशाळा उभारणी

दिवाळे गांवची स्मार्ट व्हिलेजच्या दिशेने वाटचाल

नवी मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण देशातील गावांचे स्मार्ट व्हिलेजचे स्वप्न तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाव दत्तक योजना अंतर्गत ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिवाळे गांव दत्तक घेतले आहे. नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून दिवाळे गावातील स्थानिक ग्रामस्थ ब्रास बँड वादकांकरिता प्रशिक्षण केंद्र तसेच तरुणांकरिता व्यायामशाळा बांधण्यात येत असून सदर बांधकामांचा भूमीपुजन सोहळा आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी ‘भाजपा'चे जिल्हा महामंत्री विजय घाटे, माजी नगरसेवक दीपक पवार, अनंता बोस, मंडळ अध्यक्ष दर्शन भारद्वाज, ‘भाजपा युवा मोर्चा'चे जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष विकास सोरटे, समाजसेवक पांडुरंग आमले, चंद्रकांत कोळी, जयवंत तांडेल, प्रवीण भगत, अनंत जोशी, श्याम भोंडू, सुरेखा कोळी, छाया कोळी, देवी कोळी, नर्मदा कोळी तसेच दिवाळे ग्रामस्थ उपस्थित होते.

स्मार्ट व्हिलेज अंतर्गत भव्य, सुसज्ज सर्व सुविधांयुक्त मच्छी मार्केट, उद्यान, मासे सुकविण्यासाठी प्लॅटफॉर्म, स्टेज, समाज मंदिर, रिंगरोड, स्वाध्याय हॉल, प्रसाधनगृहे, लहान मुलांकरिता खेळणी, विरंगुळा केंद्र, गजेबो गार्डन, बहुउद्देशीय इमारत, ओपन जिम, चारचाकी वाहनतळ, भाजी आणि फळ मार्केट तसेच सुशोभीकरण याकरिता १५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. याकरिता आमदार निधीची तरतूदही करण्यात येणार आहे. दिवाळे गांव स्मार्ट व्हिलेज म्हणून बनविण्यात येणार असल्याने स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. चांगले शिक्षण, आरोग्य सुदृढ होण्यास मदत मिळणार आहे. स्वच्छता आणि सार्वजनिक उपक्रमाला चालना मिळणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा ग्रामीण भागातील नागरिकांना सोई-सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रत्येक गांव स्मार्ट व्हिलेज तयार करावे, असे स्वप्न साकारले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गांव दत्तक योजनेच्या माध्यमातून सन २००४ सालापासून दिवाळे गांव मी दत्तक घेतले असून या गावामध्ये मी अनेक जेट्टी उभारल्या आहेत. दिवाळे गांवच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून आता गांव स्मार्ट व्हिलेज म्हणून तयार होणार आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे, चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा मिळणार आहेत. स्वच्छता आणि सार्वजनिक उपक्रमाला चालना मिळणार आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.


दिवाळे गांव स्मार्ट व्हिलेज होणार असल्याने सर्वप्रथम स्थानिक ग्रामस्थांचे आभार मानते. दिवाळे गांव कोळी-आगरी लोकांचे गाव असून वर्षानुवर्षे गावातील ब्रास बॅन्ड संपूर्ण पंचक्रोशीत नावाजलेला आहे. गावात बॅन्ड प्रशिक्षण केंद्र उभारावे अशी स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांनी सातत्याने केली होती. गावातील तरुणांच्या या सुप्त गुणांना वाव मिळावा
यासाठी ब्रास बॅन्ड प्रशिक्षण केंद्र बांधण्यात येत आहे. तसेच तरुणांना आणि महिलांना आपले आरोग्य सुदृढ व्हावे याकरिता व्यायामशाळाही बांधण्यात येत आहे, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या.

एकंदरीतच दिवाळे गांव माझा पायलट प्रोजेक्ट आहे. त्याच धर्तीवर बेलापूर मतदारसंघातील इतर गावेही स्मार्ट व्हिलेज म्हणून उदयास येणार आहेत. -आमदार सौ.मंदाताई म्हात्रे-बेलापूर.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

60 वर्षात बेलापूर पट्टीतील प्रकल्पग्रस्त शेतक-यांची एमआयडीसीकडुन उपेक्षा झाल्याचा आरोप